महिलांच्या हातात आर्थिक स्वातंत्र्य देण्याचं एक सुंदर स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागलं आहे, तेही त्यांच्या घराच्या चार भिंतीत राहून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणाच्या पानिपत येथून सुरू केलेली एलआयसी विमा सखी योजना ही ग्रामीण महिलांसाठी नवी आशा बनून आली आहे. आता कोणतीही साधी गृहिणी, शिक्षण कमी असली तरी, आपल्या घरातच बसून दरमहा 7,000 रुपये कमवू शकते.

जगण्याच्या खर्चात भरमसाठ वाढ झालेल्या काळात महिलांनीही आता घरखर्चाला हातभार लावण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र बाहेर जाऊन काम करणं प्रत्येकासाठी शक्य होत नाही. हेच लक्षात घेऊन एलआयसीने खास ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘विमा सखी’ ही योजना तयार केली आहे. या अंतर्गत महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात, तेही कमी खर्चात, कमी कौशल्यात आणि आपल्या गावातच राहून.
योजनेच्या अटी आणि फायदे
या योजनेत सहभागी होण्यासाठी फार काही अटी नाहीत. 10वी उत्तीर्ण असणं आणि वय 18 ते 70 वर्षे यामध्ये असणं ही मूलभूत अट आहे. विशेष बाब म्हणजे ज्या महिलांचे नवरे, मुले किंवा इतर घरचे आधीपासून एलआयसीमध्ये काम करत आहेत, त्या महिलांना अर्ज करता येणार नाही. त्याचप्रमाणे, पूर्वीचे एजंट्स किंवा निवृत्त एलआयसी कर्मचाऱ्यांनाही या योजनेत सहभागी होता येणार नाही.
या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सरकारकडून मिळणारा निश्चित पगार. प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षात दरमहा ₹7,000, दुसऱ्या वर्षी ₹6,000 आणि तिसऱ्या वर्षी ₹5,000 असे दिले जाणार आहेत. म्हणजेच, तीन वर्षांमध्ये मिळणार आहेत एकूण ₹2 लाख रुपये. एवढंच नव्हे तर या काळात महिलांना एलआयसी पॉलिसी विकून कमिशन आणि बोनस मिळण्याची संधीही असते. म्हणजेच मेहनत जास्त केली, तर कमाईही त्यापेक्षा अधिक.
या योजनेअंतर्गत संपूर्ण भारतात एकाच वर्षात 2 लाख महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना संधी दिली जाणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी 50,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांना फक्त विमा विकण्याचे तंत्र शिकवलं जात नाही, तर त्यांच्यात संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित करण्यावर भर दिला जातो.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिला एलआयसी एजंट म्हणून काम करणार आहेत. यापैकी पदवीधर महिलांना ‘विकास अधिकारी’ म्हणून कामाची संधी मिळेल. म्हणजे ही योजना केवळ उत्पन्न मिळवून देणारी नाही, तर करिअर घडवणारी संधी देखील आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज करण्याची प्रक्रिया देखील अगदी सोपी आणि ऑनलाइन आहे. इच्छुक महिलांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी आणि ‘बिमा सखीसाठी येथे क्लिक करा’ या लिंकवर जाऊन अर्ज भरावा. अर्जासोबत आधार कार्ड, वयाचा पुरावा, पत्ता पुरावा आणि 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र यांची स्व-साक्षांकित प्रत जोडावी लागेल. या योजनेमुळे केवळ महिलांचे आर्थिक जीवन बदलणार नाही, तर त्यांच्या आत्मसन्मानालाही नवी दिशा मिळणार आहे.