व्यायाम करून घाम गाळल्यानंतर शरीर फक्त थकलेले नसते, तर त्याच्या आत खोलवर स्नायूंवर खूप मोठा ताण आलेला असतो. हा ताण सहन करताना स्नायूंमध्ये सूज, वेदना किंवा थकवा जाणवू लागतो आणि म्हणूनच, व्यायामानंतरचा काळ म्हणजे आपल्या शरीराच्या दुरुस्तीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. जर या काळात योग्य अन्नपदार्थ घेतले, तर ते स्नायूंना केवळ बळकट करत नाहीत, तर शरीराला लवकर सावरण्यातही मदत करतात.

प्रोटीन शेक
प्रत्येक व्यायाम सत्रानंतर आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते. यासाठी प्रथिनांचा एक चांगला पर्याय म्हणजे प्रोटीन शेक. व्यायामानंतर लगेच घेतलेला प्रोटीन शेक थकलेल्या स्नायूंना उर्जा देतो आणि त्यांच्या पेशींमध्ये पुन्हा नवचैतन्य भरतो. हा शेक फक्त ताकदच देत नाही, तर स्नायूंना वाढवण्याच्या प्रक्रियेलाही चालना देतो.
नारळ पाणी
शरीरातून घामाच्या रूपात अनेक खनिजे बाहेर पडतात आणि त्यांची पूर्तता न झाल्यास थकवा अधिक वाढतो. अशा वेळी नारळ पाणी हा एक आदर्श पर्याय ठरतो. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि फॉलिक अॅसिडसारखे इलेक्ट्रोलाइट्स शरीराला पुन्हा हायड्रेट करतात आणि गमावलेली ऊर्जा परत आणतात. त्याचबरोबर, ते स्नायूंना नव्याने बळ देण्यात मदत करतं.
अंडी
साध्या पण प्रभावी अन्नपदार्थांमध्ये अंड्याला विसरता येणार नाही. अंडी हे प्रथिनांचं भांडार आहे. उकडलेली, ऑम्लेटच्या स्वरूपात किंवा स्क्रॅम्बल्ड कोणत्याही प्रकारात अंडी खाल्लीत, तरीही ते शरीराला हव्या त्या पोषणद्रव्यांची पूर्तता करतं आणि स्नायूंना सुदृढ बनवतं.
केळी
शरीराला व्यायामानंतर लगेचच उर्जा लागते आणि यासाठी केळी हा अगदी सहज मिळणारा पण प्रभावी पर्याय आहे. पोटॅशियमने भरलेली केळी स्नायूंमधील पेटके कमी करते आणि थकवा दूर करते. ती लगेच उर्जेची पातळी वाढवते, त्यामुळे शरीर पुन्हा गतिमान होऊ लागतं.
दही
दहीसुद्धा एक अतिशय उपयुक्त पर्याय आहे. त्यामध्ये असलेलं कॅल्शियम आणि प्रथिनं हाडांना आणि स्नायूंना आवश्यक पोषण पुरवतात. व्यायामानंतर दही खाणं हाडं मजबूत करतं आणि शरीरातील थकवा लवकर दूर होतो.
बदाम किंवा चिया बिया
शेवटी, शरीराला आवश्यक असतात चांगल्या चरबी आणि फायबरही, जे काजू व बियांमधून सहज मिळतात. बदाम, चिया बिया यांसारखे पर्याय केवळ पचन सुधारत नाहीत, तर शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढतात. त्यांचा नियमित समावेश केल्याने स्नायूंना होणारी हानी लवकर भरून निघते.