भारतीय आहारात अंडी आवर्जून खाल्ली जातात. यामध्ये भरपूर पोषण असल्याने सकाळच्या नाश्त्यात हमखास अंडी खाल्ली जातात. मात्र, हीच अंडी शाकाहारी की मांसाहारी यावर अजूनही अनेकांचा संभ्रम कायम आहे. काहींना वाटतं की अंडी खाल्लं म्हणजे आपण मांसाहार केला, तर काही जण ते शाकाहारी आहाराचा भाग मानतात. एवढंच काय, काहींना तर दूधही मांसाहारी वाटतं कारण ते प्राण्यांपासून मिळतं. मग खरी गोष्ट नेमकी काय आहे? बाजारात मिळणारी अंडी खरोखरच कोंबडीच्या संपर्कात आली नसतात का? आणि त्यांना शाकाहारी म्हणता येईल का? चला, विज्ञान काय सांगतंय ते समजून घेऊया.

अनफर्टिलाइज्ड अंडी म्हणजे?
जसं की सगळ्यांना माहिती आहे, अंड्यांचं मूळ आहे कोंबडीकडून. पण अंडी ही दोन प्रकारची असतात. एक म्हणजे फलित (फर्टिलाइज) अंडी आणि दुसरी म्हणजे अनफर्टिलाइज्ड, म्हणजेच फलित नसलेली अंडी. बाजारात आपण जी अंडी घेतो, ती सर्वसाधारणपणे फलित नसलेली असतात. म्हणजेच, ती कधीही पिल्लांचं रूप घेणार नाहीत कारण त्या अंड्यांचा कोंबड्याच्या नराशी संबंध आलेलाच नसतो.
म्हणून काही लोक या अंड्यांना “शाकाहारी” प्रकारात घालतात. कारण त्यातून कोणताही जीव निर्माण होणार नाही, आणि कोणताही प्राणी मारला जात नाही. काही प्रमाणात हे खरंही आहे. कारण या अंड्यांमध्ये भ्रूण नसतो, गर्भ नसतो. त्यामुळे त्या केवळ पोषणमूल्यांच्या दृष्टीनेच महत्त्वाच्या ठरतात.
पण इथं एक वेगळी बाजूही आहे. काही शाकाहारी लोक मात्र अंडी खाणं टाळतात, कारण त्यांचं असं मानणं आहे की अंडी ही एक प्राण्याच्या शरीरातून मिळणारी गोष्ट आहे, आणि त्यामुळे ती मांसाहारीच आहे. शिवाय, काही लोकांचं असंही मत आहे की अंडी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कोंबडींचं शोषण होतं, त्यांना नैसर्गिक पद्धतीने जगू दिलं जात नाही, सतत अंडी देण्यास भाग पाडलं जातं.
अंडी शाकाहारी की मांसाहारी?
अशा विचारांमुळे काही लोक अंडी पूर्णतः वर्ज्य करतात. पण दुसरीकडे अनेक शाकाहारी लोक फक्त फलित नसलेली अंडी खातात आणि त्या आहाराला ‘एगेटेरियन’ असं म्हणतात.
एकंदरीत पाहता, बाजारातली अंडी जर फलित नसतील, तर त्या अंड्यांत जीव निर्माण होणार नाही, आणि त्या अंड्यांच्या निर्मितीत कोणत्याही प्राण्याचा मृत्यू होत नाही. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या त्या मांसाहारी मानल्या जात नाहीत. मात्र, अंतिम निर्णय हा प्रत्येकाच्या श्रद्धा, मूल्यं आणि वैयक्तिक आहारधारणांवर अवलंबून असतो.