जगातील एका देशात लवकरच आकाशातून उडणाऱ्या टॅक्सी दिसून येणार आहेत. या कल्पनांना आता दुबई मूर्त स्वरूप देत आहे. 2026 पासून दुबईत खऱ्या अर्थानं उडत्या टॅक्सी हवेत झेपावणार आहेत. दुबई म्हणजे भव्यतेचा, वेगाचा आणि नवकल्पनांचा परमोच्च नमुना. आणि आता त्याच्या आकाशात भरारी घेणार आहे हवाई टॅक्सी सेवा. एक अशी सेवा जी वाहतुकीच्या इतिहासात क्रांती घडवू शकते. अमेरिकेतील प्रसिद्ध एअर मोबिलिटी कंपनी जॉबी एव्हिएशन या प्रकल्पामागे काम करत आहे. तिचं उद्दिष्ट स्पष्ट आहे, शहरातली ट्रॅफिकची घालमेल दूर करणं आणि लोकांना कमी वेळात, अधिक आरामात प्रवास देणं.

कशी असेल ही सेवा?
ही हवाई सेवा चार ठिकाणांवरून सुरू होईळ. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, डाउनटाउन दुबई, पाम जुमेरा आणि दुबई मरीना. ही ठिकाणं म्हणजे दुबईतील वाहतुकीची मुख्य केंद्रं, जिथून उडत्या टॅक्सी सहज उपलब्ध होतील. पहिला ‘व्हर्टीपोर्ट’ म्हणजे हवाई टॅक्सींचं लँडिंग प्लॅटफॉर्म, 2026 च्या सुरुवातीपर्यंत तयार होईल, असं सांगितलं जातंय.
प्रवासाचा वेग तर थक्क करणारा आहे. उदाहरणार्थ, दुबई एअरपोर्ट ते पाम जुमेरा ही साधारण 45 मिनिटांची कारयात्रा, एअर टॅक्सीमध्ये केवळ 12 मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे फक्त वेळच वाचणार नाही, तर प्रवासाचाही दर्जा उच्च पातळीवर जाणार आहे.
टॅक्सीचं बुकिंग कसं असेल?
या टॅक्सीचं बुकिंग करणंही अतिशय सोपं असणार आहे. जसं आपण उबर किंवा ओलामधून कार बुक करतो, तसं अॅपवरूनच हे बुकिंग होणार आहे. विशेष म्हणजे जॉबी ही उबरची जागतिक भागीदार असल्यामुळे एकाच अॅपवरून बुकिंग, पेमेंट आणि इतर सुविधा मिळू शकतात.
टॅक्सीचं डिझाईन सुद्धा विलक्षण आहे. पारदर्शक काचांमुळे तुम्हाला दुबईचं आकाशातून सुंदर दृश्य पाहता येईल. एका लक्झरी हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा अनुभव यातून मिळणार आहे. प्रवाशांसाठी हा फक्त एक प्रवास नसेल, तर एक थरारक अनुभव असेल.
प्रत्येक टॅक्सीमध्ये चार प्रवासी आणि एक पायलट बसू शकतील. आजवर 60,000 किमीहून अधिक चाचणी उड्डाणं यशस्वीपणे पार पडली आहेत, त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा अगदी ठाम आहे. सर्व पायलट अनुभवी व परवानाधारक असतील आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल.
प्रवासी दर किती असतील?
भाड्याबाबत बोलायचं झालं तर एका प्रवासासाठी साधारण $75 (सुमारे ₹6,500) इतका खर्च अपेक्षित आहे. ही किंमत उबर ब्लॅकसारख्या प्रीमियम सेवांच्या जवळपास आहे, पण अनुभवाच्या बाबतीत हे स्वप्नवत असेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या टॅक्सीचा कमाल वेग ताशी 320 किमीपर्यंत असणार आहे.