जंगल, नदी, दुर्मिळ प्राणी आणि…’ही’ आहे जगातील सर्वात मोठी गुहा; जिच्या आत सामावलंय एक अद्भुत जग! तुम्ही कधी पाहिलीये का?

Published on -

व्हिएतनाममधील सोंग डोंग गुहा ही केवळ एक नैसर्गिक गुहा नसून ती एक वेगळंच जग आहे, जिथे तुम्ही नद्या, जंगले आणि ढग देखील पाहू शकता. ही गुहा जगातील सर्वात मोठी गुहा मानली जाते. तिची रचना, आकारमान, जैवविविधता आणि अंतर्गत सौंदर्य इतकं विलक्षण आहे की वैज्ञानिक, पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांना ती भुरळ घालते.

सोंग डोंग गुहेचा शोध

ही गुहा 1990 मध्ये ‘हो खान’ नामक एका स्थानिक व्यक्तीने शोधली होती. मात्र त्यावेळी तिच्या वास्तविक महत्त्वाची कल्पना कुणालाही नव्हती. 2009 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या पथकाने तिला सर्वेक्षणाद्वारे जगापुढे सादर केलं आणि तिचं अनोखं अस्तित्व उघड झालं.

सोंग डोंग गुहा सुमारे 9 किलोमीटर लांब आहे. काही ठिकाणी ती 200 मीटर उंच आणि 150 मीटर रुंद आहे. अशा भव्य आकारमानामुळे, 40 मजली उंचीची इमारतही त्यात सहज उभी राहू शकते. गुहेच्या आत एक भव्य दगडी भिंत आहे, जिला ‘ग्रेट वॉल ऑफ व्हिएतनाम’ म्हटले जाते.

गुहेतलं अनोखं जग

गुहेच्या आत नद्या वाहतात, नैसर्गिक तलाव आहेत, तसेच छतावरील उघड्या भागांमधून सूर्यप्रकाश आत आल्यामुळे हिरवीगार झाडंही वाढली आहेत. त्यामुळे येथे एक प्रकारचं ‘आंतरगुहा जंगल’ तयार झालं आहे. या ठिकाणी काही दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी आढळतात, जे इतरत्र कुठेही सापडत नाहीत.

या गुहेत कधी कधी ढग तयार होतात – ही बाब पर्यावरणशास्त्रज्ञांनाही अचंबित करणारी आहे. याशिवाय, आत ‘स्टॅलॅगमाइट्स’ नावाचे 70 मीटरपेक्षा उंच खडकाचे स्तंभ आढळतात, जे गुहेची शोभा अधिक वाढवतात.

पर्यटन

इतकी भव्य गुहा असल्यामुळे येथे पर्यटन मर्यादित आहे. दरवर्षी फक्त काही पर्यटकांना विशेष परवानगीने याठिकाणी भेट देता येते. हे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अत्यावश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe