दिवसभरातील ऑफिसची कामे, घरातील कामे , धावपळ आणि सततचा तणाव यामुळे आपण चेहऱ्याकडे लक्ष देणं अनेकदा विसरतो. त्यामुळेच आपली त्वचा थकलेली, कोरडी आणि तेजहीन दिसू लागते. मग आपण थेट महागड्या ब्यूटी सैलूनकडे धाव घेतो. फेशियल्स, क्लीनअप्स आणि ट्रीटमेंट्सच्या नावाखाली हजारो रुपये खर्च करतो. पण खरं सांगायचं तर, यासाठी इतका खर्च करण्याची गरजच नाही. घरच्या घरी, अगदी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंनी तुम्ही नैसर्गिक आणि आश्चर्यकारक चमक मिळवू शकता.

दही आणि बेसनाचा फेस मास्क
आपल्या आजीपासून आईपर्यंत सर्वांनी वेळोवेळी याचा उपयोग केलेला असतो. हा मास्क केवळ चेहऱ्यावरील घाण आणि तेलकटपणा दूर करत नाही, तर त्वचेला आतून हायड्रेट करून नैसर्गिक उजळपणाही देतो. बनवायलाही तो अतिशय सोपा आहे.
दोन चमचे बेसन, तीन चमचे ताजं दही आणि चिमूटभर हळद घ्यावी. हे सगळं एकत्र कालवून एक गडद पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटं वाळू द्या आणि मग थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा हे केल्यास तुम्हाला फारच लवकर परिणाम दिसू लागतील.
मध आणि लिंबाचा मास्क
दुसरा एक अत्यंत प्रभावी पर्याय म्हणजे मध आणि लिंबाचा मास्क. हे दोन्ही घटक आपल्या घरी सहज सापडतात, पण त्याचे सौंदर्य लाभ खूप मोठे आहेत. मधामुळे त्वचेची आंतरिक आर्द्रता टिकून राहते, तर लिंबातील सायट्रिक अॅसिड त्वचेवरील डाग, टॅन आणि मृत पेशी दूर करण्यास मदत करतं.
एक चमचा ताजं मध आणि अर्धा लिंबाचा रस घेऊन एकत्र करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटं ठेवा. नंतर हलकं थंड पाणी वापरून धुवा. काही वेळातच तुमचा चेहरा ताजातवाना आणि उजळ वाटेल.
या घरगुती उपायांमुळे फक्त चेहऱ्याचं सौंदर्य वाढत नाही, तर ते आपल्या त्वचेला रसायनमुक्त, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी चमकही देतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यात कोणताही खर्च नाही आणि कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत.