97 वरून थेट 258 वर… सततच्या रॉकेट प्रक्षेपणामुळे पृथ्वीचा संरक्षण कवच धोक्यात, ओझोन थराबाबत वैज्ञानिकांचा गंभीर इशारा!

Published on -

कधीकाळी चंद्रावर जाण्याची, ताऱ्यांशी खेळण्याची ही फक्त स्वप्न वाटत. मात्र, आज ती स्वप्नं खरी झाली आहेत. पण त्या स्वप्नांमागे उडालेली धूळ आता पृथ्वीच्या आरोग्यावर बसतेय. ओझोन थर, जो आपल्याला सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून वाचवत असतो, आज एका नव्या आणि शांतपणे वाढणाऱ्या संकटाचा सामना करत आहे. ते संकट म्हणजे, अवकाशात सुरू असलेली रॉकेट्सची गर्दी आणि त्यामागे निर्माण होणारं प्रदूषण.

ओझोन थराच्या जाडीमध्ये घट

गेल्या काही वर्षांपासून शास्त्रज्ञ सातत्याने हे सांगत आहेत की रॉकेट प्रक्षेपणांमुळे वातावरणात जे रसायनं आणि कण सोडले जातात, ते थेट वरच्या थरांपर्यंत पोहोचतात, जिथे ती शुद्ध होण्याची कोणतीही नैसर्गिक प्रक्रिया अस्तित्वातच नाही. हे घातक कण तिथेच जमा होतात आणि हळूहळू ओझोन थर पोखरत जातात. शिवाय, जुने उपग्रह आणि अवकाशातील कचरा जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात परत येतो, तेव्हाही हवेतील संतुलन ढासळवणारे कण आणि वायू सोडले जातात.

 

ही गोष्ट केवळ सैद्धांतिक नाही. आकडेवारी हेच सांगते की समस्या वाढतेच आहे. 2019 मध्ये फक्त 97 रॉकेट्स अवकाशात झेपावली होती. 2024 मध्ये हा आकडा थेट 258 पर्यंत गेला. आणि 2030 पर्यंत हे रॉकेट प्रक्षेपण 2000 च्या वर जातील, असा अंदाज आहे. अर्थातच, विज्ञानाच्या दृष्टीने हे एक यश आहे, पण निसर्गाच्या संतुलनासाठी मात्र हा धोक्याचा इशारा आहे.

शास्त्रज्ञांचा धक्कादायक इशार

 

ETH झ्युरिच आणि कॅन्टरबरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला, ज्यात हवामान आणि रासायनिक बदलांचं मॉडेल वापरून निरीक्षण केलं. त्यांनी स्पष्ट केलं की जर रॉकेट उत्सर्जन सध्याच्या तुलनेत 8 पट वाढलं, तर जागतिक पातळीवर ओझोन थराची जाडी 0.3% ने घटू शकते.

 

हे प्रमाण अंटार्क्टिकासारख्या संवेदनशील भागांमध्ये 4% पर्यंत पोहोचू शकतं आणि ही घट हवामान संतुलनासाठी अत्यंत गंभीर आहे. गंमत म्हणजे, ओझोन थर अजूनही आपल्या जुन्या चुकीची भरपाई करत आहे. 1980-90 च्या दशकात CFCs नावाच्या रसायनांमुळे ओझोन थराला मोठा धोका पोहोचला होता.

पण आंतरराष्ट्रीय करारांमुळे त्या रसायनांवर बंदी आली, आणि आज ओझोन थर 2066 पर्यंत पूर्णपणे सावरू शकतो, अशी आशा वैज्ञानिकांना वाटते. पण आता हे नवीन अवकाशीय प्रदूषण त्याच्या पुनर्प्राप्तीच्या प्रक्रियेत पुन्हा अडथळा निर्माण करतंय. इतका की, ती भरपाई आणखी काही दशकं लांबू शकते.

त्यामुळे विज्ञान आणि पर्यावरण यांच्यात समतोल साधण्याची गरज निर्माण झाली आहे. रॉकेट प्रक्षेपण नियंत्रित करणं, अवकाशातील कचऱ्यावर उपाय शोधणं आणि प्रदूषणविरहित तंत्रज्ञान विकसित करणं हे सगळं तातडीनं घडणं गरजेचं आहे. कारण ओझोन थर म्हणजे केवळ एका वायूचा थर नव्हे, तर तो आपल्या भविष्यासाठी महत्त्वाचा संरक्षक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!