नो-क्लेम बोनसपासून अॅड-ऑन कव्हरपर्यंत, Car Insurance रिन्यू करताना ‘हे’5 नियम लक्षात ठेवाच! अन्यथा नंतर होईल पश्चात्ताप

Published on -

कार किंवा बाईक असणं ही फक्त सोयीची गोष्ट नाही, ती आता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाली आहे. मात्र वाहन घेतल्यावरच जबाबदाऱ्या संपत नाहीत. त्याच्या देखभालीइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा. आणि जेव्हा त्या विम्याची मुदत संपत येते, तेव्हा त्याचं वेळेत आणि योग्य प्रकारे नूतनीकरण करणं हे तुमच्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यावश्यक ठरतं. पण अनेकदा आपण हे नूतनीकरण घाईघाईत, फार विचार न करता करतो आणि मग एखादा अपघात किंवा तांत्रिक अडचण आल्यावर पश्चात्ताप करावा लागतो.

अॅड-ऑन कव्हर

अनेकदा लोक जुन्या अटींवरच पॉलिसी चालू ठेवतात, पण दरवर्षी गरजा बदलतात आणि त्यानुसार विम्याच्या अटीही बदलायला हव्यात. उदाहरणार्थ, जर तुम्ही पूरग्रस्त भागात राहत असाल, तर इंजिन प्रोटेक्शनसारखं अॅड-ऑन कव्हर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. असंच ‘झिरो डेप्रिसिएशन’ कव्हरही आहे, ज्यामुळे अपघातानंतर गाडीच्या बाजारमूल्यानुसार भरपाई मिळते.

‘नो-क्लेम बोनस’

विमा नूतनीकरण करताना ‘नो-क्लेम बोनस’ (NCB) या संकल्पनेवर विशेष लक्ष द्या. जर गेल्या वर्षी तुम्ही एकही दावा केला नसेल, तर विमा कंपनीकडून तुम्हाला 20% ते 50% पर्यंत प्रीमियममध्ये सवलत मिळू शकते. पण ही सवलत तुम्हाला तेव्हाच मिळेल, जेव्हा पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसांच्या आत तुम्ही नूतनीकरण करता.

‘वॉलन्टरी डिडक्शन ’

तसेच, ‘वॉलन्टरी डिडक्शन ’ ही संकल्पना अनेकांना माहित नसते. यात तुम्ही ठराविक रक्कम स्वतः भरायची तयारी दाखवता आणि त्यामुळे तुमचा वार्षिक प्रीमियम कमी होतो. जर तुम्ही फारसं वाहन चालवत नसाल, किंवा तुमचं वाहन व्यवस्थित सांभाळलं जातं, तर हा पर्याय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

‘एक्सक्लूजन’

याशिवाय, ‘एक्सक्लूजन’ म्हणजे विमा कव्हरमध्ये काय समाविष्ट नाही, हे स्पष्टपणे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्या परिस्थितीत विमा दावा नाकारला जाऊ शकतो हे आधीच जाणून ठेवलं, तर नंतर वादाची शक्यता कमी होते. आणि जर एखादं कव्हर सध्या तुमच्या पॉलिसीत नसेल, पण तुम्हाला ते हवं असेल, तर थोडा अतिरिक्त प्रीमियम भरून ते घ्यायचा पर्यायही खुला असतो.फक्त विमा कंपनीशी संवाद साधायला विसरू नका.

अॅप्लिकेशन बेस्ड क्लेम

आजकाल अनेक विमा कंपन्यांनी स्मार्टफोन अ‍ॅप्सच्या माध्यमातून दावा प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. या अ‍ॅप्समधून तुम्ही अपघाताचे फोटो, व्हिडिओ अपलोड करून 20 मिनिटांत ठराविक रकमेपर्यंतचा दावा सुलभपणे प्राप्त करू शकता. तुमची पॉलिसी नूतनीकरण करताना अशा डिजिटल सोयी उपलब्ध आहेत का, हे तपासून पाहा.कारण प्रत्यक्ष गरजेच्या वेळी त्याचा मोठा फायदा होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!