श्रीसंत ते सुशील कुमार…गुन्हे आणि जेलवारीमुळे बदनाम झाले ‘हे’ 5 खेळाडू! एकावर तर हत्येचाही आरोप

खेळाडू हे समाजासाठी प्रेरणास्थान असतात. त्यांच्या खेळगुणामुळे लाखो चाहते त्यांचं अनुकरण करतात. पण काही वेळा हेच खेळाडू मैदानाबाहेर अशा वादात अडकतात की त्यांच्या नावाची शोभा धुळीत जाते. आज आपण अशा पाच प्रसिद्ध खेळाडूंच्या कथा पाहणार आहोत, जे आपल्या वाईट कृत्यांमुळे थेट तुरुंगात पोहोचले. या यादीत आश्चर्यकारक बाब म्हणजे, भारतीय खेळाडूंचा मोठा भरणा आहे.

श्रीसंत

सुरुवात करुया त्या खेळाडूपासून ज्याच्या फिक्सिंग प्रकरणाने क्रिकेटविश्व हादरून गेले होते. भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंत 2005 मध्ये क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण करतच चाहत्यांच्या गळ्यातला ताईत झाला होता. पण 2013 मध्ये IPL दरम्यान त्याचं नाव स्पॉट फिक्सिंगमध्ये आले आणि त्याला तिहार तुरुंगात एक महिना काढावा लागला. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती, जी नंतर शिथिल झाली.

नवज्योत सिंग सिद्धू

पण श्रीसंत एकटाच नव्हता. 1988 मध्ये पतियाळामध्ये पार्किंगवरून झालेल्या वादात माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूने एका व्यक्तीच्या डोक्यावर मारल्याचा आरोप होता. तो व्यक्ती नंतर दगावला. यानंतर सिद्धूवर खटला चालला आणि अखेर त्याला 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. कधी लोकसभा खासदार, कधी टीव्हीवरील जोशपूर्ण वक्ता… पण याच सिद्धूची कारकीर्द कोर्टाच्या आदेशाने अडचणीत आली होती.

सुशील कुमार

या यादीतील तिसरं नाव आहे भारतासाठी ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार. बीजिंग आणि लंडनमध्ये देशासाठी पदकं जिंकणाऱ्या सुशीलवर दिल्लीतील एका स्टेडियममध्ये ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता.

चेड इव्हान्स

पुढचं नाव आहे फुटबॉलपटू चेड इव्हान्सचं. मँचेस्टर सिटीचा हा स्ट्रायकर 2012 मध्ये बलात्कार प्रकरणात दोषी ठरला आणि त्याला अडीच वर्षांची शिक्षा झाली. पण नंतर न्यायालयात पुन्हा तपास सुरू झाला आणि इव्हान्स निर्दोष सुटला. त्याच्या नावावर खोटा आरोप लावण्यात आला होता. सुटकेनंतर त्याने चेस्टरफील्डसाठी करार करत फुटबॉलमध्ये पुनरागमन केलं.

संदीप लामिछाने

शेवटचं नाव नेपाळच्या क्रिकेटचा तेजीत असलेला लेगस्पिनर संदीप लामिछानेचं. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. न्यायालयाने त्याला 8 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर उच्च न्यायालयाने ती शिक्षा रद्द करत त्याची निर्दोष मुक्तता केली.