आर्थिक अडचणींमुळे कित्येक हुशार मुलींची स्वप्नं अर्धवट राहतात. मात्र कानपूरच्या हार्कोर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटीने (HBTU) घेतलेले एक छोटंसं पण क्रांतिकारक पाऊल या सर्व मर्यादांवर मात करत आहे. या विद्यापीठाने घेतलेला निर्णय म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने टाकलेलं एक ठोस पाऊल आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीतील हुशार मुलींना बी.टेकसारखं उच्च शिक्षण अवघ्या ₹1 मध्ये दिलं जाणार आहे.

HBTU ची योजना नेमकी आहे तरी काय?
उत्तर प्रदेशातल्या HBTU ने जाहीर केलेली ही योजना शिक्षणक्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करणारी आहे. याअंतर्गत दरवर्षी दोन टॉपर विद्यार्थिनींना, ज्या अनुसूचित जाती किंवा जमातींमधून येतात, त्या केवळ ₹1 मध्ये इंजिनीअरिंगचं संपूर्ण शिक्षण घेऊ शकतात. त्या आधी इतर सर्व विद्यार्थ्यांप्रमाणे फी भरतील, मात्र नंतर विद्यापीठ स्वतः त्यांना संपूर्ण शुल्क परत करेल. त्या फक्त एका रुपयात आपली पदवी पूर्ण करू शकतील.
कधीपासून सुरु होईल योजना?
ही योजना 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाणार आहे. सुरुवातीला दोन विद्यार्थिनींसाठी असलेली ही योजना भविष्यात आणखी विद्यार्थिनींसाठी खुली होईल अशी अपेक्षा आहे.
HBTU चे डीन डॉ. ललित कुमार सिंह यांनी सांगितले की, ही योजना उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष आदेशामुळे (Government Order – GO) सुरू होत आहे. यामागचा उद्देश म्हणजे वंचित वर्गातील मुलींना उच्च शिक्षणात पुढे आणणे आणि त्यांना तांत्रिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करणे.
या उपक्रमामुळे केवळ शिक्षणाची संधी मिळणार नाही, तर त्या मुलींना आत्मनिर्भर बनण्याचं बळही मिळणार आहे. त्या स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य उभं करू शकतील. एवढंच नव्हे तर, समाजातही एक नवा विचार तयार होईल की शिक्षण हे सर्वांचं हक्काचं आहे, केवळ पैशांच्या जोरावर नाकारले जाणारं स्वप्न नव्हे.