श्रावण महिना सुरू झाला की, संपूर्ण वातावरण भक्तीमय होऊन जातं. प्रत्येक घरात शिवभक्तीची लगबग सुरू होते. कुठे अभिषेक, कुठे शिवलिंगाची सजावट, तर कुठे बेलपत्राचं पूजन. पण या भक्तीमध्ये एक गोष्ट आपण सहसा विसरतो. ती म्हणजे आपल्या घरातील वास्तूचे नियम. खरं तर, श्रावणात केवळ पूजा नव्हे, तर घरात योग्य वास्तुशास्त्रीय उपाय केल्यास भगवान शिवाचा कृपावर्षाव अगदी सहजपणे लाभू शकतो.

7 वास्तू उपाय
या पवित्र महिन्यात आपल्या घरातील स्वच्छता हे पहिले पाऊल असावं. कारण स्वच्छतेत देवता वास करतात, असं मानलं जातं. विशेषतः ईशान्य कोपरा ज्याला शिवाचे स्थान मानलं जातं. तो कोपरा रोज गंगाजल मिसळलेल्या पाण्याने स्वच्छ करणं, कापूर जाळून तिथे दिवा लावणं ही अत्यंत शुभ कृती आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे आपल्या घराला शुद्ध ठेवतो, तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपोआपच बाहेर पळते.
पूजास्थळाची दिशा ही देखील फार महत्त्वाची आहे. जर तुमचं पूजाघर ईशान्य दिशेला असेल, तर ते अगदी योग्य आहे. या दिशेला शिवलिंग किंवा शिव कुटुंबाची स्थापना करून, बेलपत्र, दूध, गंगाजल यांची नित्यपूजा केल्याने तुम्ही केवळ धार्मिकच नव्हे, तर वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातूनही फायदेशीर पाऊल उचलत आहात. पण लक्षात ठेवा, पूजास्थळी कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा जड वस्तू नकोत. जिथे शिव असतात, तिथे केवळ शुद्धता आणि शांतता असावी.
श्रावणात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हे महत्त्व केवळ आध्यात्मिक नाही, तर वास्तुशास्त्रीयदृष्ट्याही आहे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात जर तुम्ही एक छोटंसं कारंजं किंवा गंगाजलाने भरलेला कलश ठेवलात, तर त्या पाण्याचा प्रवाह तुमच्या घरात सातत्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दररोज सकाळी गंगाजल शिंपडणं हे केवळ शुद्धतेचं नव्हे, तर देवतेच्या कृपेचंही प्रतीक मानलं जातं.
रंगसंगतीही घरातील ऊर्जेसाठी जबाबदार असते. पांढरे, हलके निळे किंवा हिरवे रंग भिंतींवर वापरले, तर ते डोळ्यांना शांती देतात आणि मनाला प्रसन्न करतात. रात्री, शिवलिंगाजवळ एक छोटासा दिवा लावणं हे जणू देवाशी जोडलेलं एक नातं आहे.
वनस्पतींबद्दल बोलायचं झालं, तर श्रावणात तुळस, बेलपत्र किंवा शमीचे रोप घरात असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. विशेषतः बेलपत्र कारण ते भगवान शिवाच्या हृदयाशी जोडलेलं आहे. या झाडांची पूजा करणे म्हणजे केवळ निसर्गपूजन नव्हे, तर त्यातून एक आध्यात्मिक सकारात्मकता घरात ओतप्रोत भरणं.
वास्तूदोष ‘असा’ दूर करा
जर तुमच्या घरात वास्तु दोष जाणवत असेल म्हणजेच सतत वाद, त्रास किंवा आर्थिक अडचणी असतील तर श्रावण महिना हा अशा दोषांपासून मुक्त होण्यासाठी योग्य वेळ आहे. दरवाज्यावर स्वस्तिक किंवा ओमचं चिन्ह काढा, ईशान्य दिशेला लहान शिवलिंग स्थापन करा, रुद्राक्ष माळ घरात ठेवा. हे उपाय खूपच साधे वाटतात, पण प्रभाव मात्र खोलवर असतो.