जर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा आला असेल आणि एकदाच रिचार्ज करून तब्बल 6 महिने निश्चिंत व्हायचं असेल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. हल्ली मोबाईल सेवा कंपन्या ग्राहकांच्या गरजांनुसार अनेक लाँग व्हॅलिडिटी आणि परवडणारे प्लॅन देत आहेत. विशेष म्हणजे, काही प्लॅन इतके बजेटमध्ये आहेत की दररोज फक्त 5 रुपयांपेक्षा कमी खर्चात कॉल, डेटा आणि एसएमएससारख्या सुविधा मिळू शकतात. चला तर पाहूया, सध्या कोणते दीर्घकालीन प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी खरोखर फायदेशीर ठरू शकतात.

BSNL चे प्लॅन्स
सुरुवात करुया बीएसएनएलच्या एका खूपच परवडणाऱ्या प्लॅनने. बीएसएनएलचा 897 रुपयांचा प्लॅन तब्बल 180 दिवसांची वैधता देतो. म्हणजेच, हा प्लॅन घेतल्यास तुम्ही तब्बल 6 महिने रिचार्जच्या झंझटीपासून मोकळे होता. यामध्ये दररोज अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित डेटा आणि 100 एसएमएस मिळतात. डेटा वापर 90GB झाल्यानंतर इंटरनेटचा वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. पण तरीही, दिवसाला फक्त 4.98 रुपये इतक्या किंमतीत मिळणाऱ्या या सेवा पाहता, हा एक अत्यंत किफायतशीर पर्याय ठरतो.
तुम्हाला जर किंचित अधिक डेटा आणि थोडीशी कमी वैधता चालणार असेल, तर बीएसएनएलचा आणखी एक प्लॅन आहे. 997 रुपयांमध्ये 160 दिवसांची वैधता देणारा हा प्लॅन दररोज 2GB डेटा, 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगसह येतो. इंटरनेट मर्यादा संपल्यावर स्पीड 40Kbps होतो, ही एक मर्यादा असली तरी, दिवसाला फक्त 6.2 रुपये खर्चात मिळणाऱ्या सुविधा बऱ्याच उपयोगी पडतात.
Vi चे प्लॅन्स
पुढे पाहूया Vi अर्थात व्होडाफोन आयडियाचे काही दमदार प्लॅन. Vi चा 1,749 रुपयांचा प्लॅन 180 दिवसांची वैधता देतो आणि यामध्ये दररोज 1.5GB डेटा, 100 एसएमएस, अमर्यादित कॉल याशिवाय अनेक आकर्षक फायदे मिळतात. उदाहरणार्थ, 45 दिवसांसाठी 30GB अतिरिक्त डेटा, रात्री अमर्यादित डेटा वापरता येणारी “बिंज ऑल नाईट” सुविधा, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अमर्यादित 5G डेटा यांचा समावेश आहे. यासाठी दिवसाला 9.71 रुपये खर्च येतो, जो फिचर्सच्या तुलनेत योग्यच म्हणावा लागेल.
जर तुम्ही कंटेंट लव्हर असाल, तर Vi चाच आणखी एक प्रीमियम प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. 2,399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित कॉल, 100 एसएमएस आणि यासोबत ViMTV चं सबस्क्रिप्शन मिळतं, ज्यात 400 हून अधिक टीव्ही चॅनेल्स आणि 16 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये साप्ताहिक डेटा रोलओव्हर आणि 5G डेटा अक्सेसही दिला जातो. या सर्व सुविधांसाठी दिवसाला 13.32 रुपये खर्च येतो.
Jio चे प्लॅन्स
शेवटी जिओचा एक दीर्घकालीन प्लॅन जो 200 दिवसांच्या वैधतेसह येतो. 2,025 रुपयांचा हा प्लॅन दररोज 2.5GB डेटा म्हणजेच एकूण 500GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएस प्रदान करतो. यामध्ये JioTV, JioAI Cloud आणि Hotstar चं सबस्क्रिप्शन मोफत दिलं जातं. तसेच अमर्यादित 5G डेटा यामध्ये समाविष्ट आहे.