बाली… एक असं ठिकाण, जे जगभरात आपल्या सौंदर्यामुळे, शांततेमुळे आणि निसर्गसंपन्नतेमुळे ओळखलं जातं. अनेक जोडप्यांचं हे ‘ड्रीम डेस्टिनेशन’ आहे. पण सध्या बाली एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की बालीला गेलेल्या अविवाहित जोडप्यांमध्ये नात्याचं बंधन टिकत नाही… आणि या कथेला जोडलं जातं एक विचित्र शापाशी! हे ऐकून धक्का बसतो, पण लोक खरोखर यावर विश्वास ठेवायला लागलेत. मग, या गूढ शापामागे खरंच काही तथ्य आहे का?

तनाह लोट मंदिर
इंडोनेशियामधलं बाली हे ठिकाण नुसतं नैसर्गिक सौंदर्यामुळेच नाही, तर आपली सांस्कृतिक श्रीमंती आणि हिंदू परंपरेतील मंदिरांमुळेही प्रसिद्ध आहे. याच बालीतलं तनाह लोट मंदिर सध्या या ‘ब्रेकअप शाप’चं केंद्रबिंदू मानलं जातं. समुद्राच्या मधोमध वसलेलं हे मंदिर पाहताना वाटतं, की जणू समुद्रानेच याला कवेत घेतलंय. इतकं देखणं ठिकाण, पण लोक म्हणतात की इथे गेलेल्या अविवाहित जोडप्यांचं नातं टिकत नाही.
या चर्चेची सुरुवात एका व्हायरल व्हिडिओमधून झाली. त्यात असं दाखवलं गेलं की बालीला गेलेल्या अनेक जोडप्यांचं ब्रेकअप झालं, विशेषतः तनाह लोट मंदिरात गेल्यानंतर. Redditसारख्या प्लॅटफॉर्मवर लोकांनी स्वतःचे अनुभव शेअर करत ही गोष्ट पुढे पसरवायला सुरुवात केली. काहींनी ही गोष्ट हसण्यावारी नेली, पण काहींनी मात्र ती आपल्यावर घडली म्हणून स्वीकारली.
काय आहे यामागील सत्य?
पण यामागे खरंच काही अंधश्रद्धा आहे का? की केवळ मनोवैज्ञानिक प्रभाव? मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, जेव्हा जोडपं एकत्र परदेशात जातं, तेव्हा प्रवासाचा थकवा, खर्चाचा ताण, आणि दिवसेंदिवसचा सगळा वेळ एकमेकांसोबत घालवण्यामुळं अनेकवेळा दडपलेली कुरबूर समोर येते. जर नातं आधीच कमकुवत असेल, तर अशा ट्रीपवर ते अजूनच ताणतणावात जातं. बालीचा शाप म्हणण्याऐवजी हे वास्तव म्हणून स्वीकारणं जास्त योग्य ठरेल.
हे मंदिर म्हणजे नात्याची परीक्षा घेतं, असं अनेकांचं मत आहे. पण खरं पाहिलं तर हे देवस्थान बालीच्या पारंपरिक आणि धार्मिक संस्कृतीचं प्रतीक आहे. मंदिराला कोणी ‘शापित’ मानतं, तर अनेक जोडप्यांसाठी ते एक पवित्र आणि रोमँटिक स्थळही आहे. जे एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांवर विश्वास ठेवतात त्यांचं नातं कुठेही तुटत नाही. मग ते बाली असो की दुसरं कोणतंही ठिकाण.
या ‘शापा’बाबत सोशल मीडियावर अजूनही चर्चांची भरती असते. काहीजण याला केवळ एक मजेशीर ट्रेंड मानतात, तर काही लोक खरंच त्यात गुंतलेले दिसतात. पण शेवटी, कोणतंही नातं शापाने तुटत नाही… ते तुटतं ते फक्त समजूतदारपणा, संवाद आणि विश्वासाच्या अभावामुळे.