सराफा बाजारात आज चांदीने सोन्यालाही मागे टाकलंय. सोनं हे भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जात आलंय, पण आता चांदीनं अचानक अशी झेप घेतली आहे की तिच्या किमतीं पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. चांदीच्या किमतींनी विक्रमी पातळी गाठली असून, तिच्या तेजाने सोन्याची चमक काहीशी फिकट झाली आहे.

चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. आज 24 जुलै रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीने तब्बल 1,16,555 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला. ही किंमत चांदीसाठी आतापर्यंतची सर्वात जास्त नोंदवलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा चांदीच्या दराने मागील 14 वर्षांतली सर्वोच्च मजल मारली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या नजरा चांदीवर स्थिरावल्या आहेत.
सोन्याचे उच्चांकी दर
दुसरीकडे, सोनंही मागे नाही. त्याच दिवशी सोन्याचा दर 1,03,490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. हे सुद्धा सोन्याचे ऐतिहासिक उच्चांक मानले जात आहेत. मात्र परताव्याच्या बाबतीत चांदी आघाडीवर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याने जिथं 3% परतावा दिला, तिथं चांदीने जवळपास 9% नफा कमावला आहे. वर्षभरात पाहिल्यास, सोन्याचे दर 32% नी वाढले असतानाच चांदीने 36% ची उसळी घेतली आहे.
दरवाढीमागील कारणे
या दरवाढीचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे चांदीची वाढती औद्योगिक मागणी. इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनल्स, मेडिकल उपकरणं अशा अनेक क्षेत्रांत चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळेच मागणी वाढल्यावर किंमतही उंचावते आहे. हे सलग चौथे वर्ष आहे की ज्या वर्षी चांदीची औद्योगिक मागणी प्रचंड वाढली आहे.
पण सामान्य गुंतवणूकदाराचा प्रश्न अजूनही कायम आहे, ही वाढ किती काळ टिकेल? याचं निश्चित उत्तर कोणालाच देता येत नाही. दरांच्या चढ-उतारामागे जागतिक आर्थिक स्थिती, डॉलरची मजबुती, व्याजदर, आणि महागाई यांसारखे अनेक घटक कारणीभूत असतात. मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की दिवाळीपर्यंत या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर स्थिर किंवा वाढीच्या प्रवासातच राहतील.