तब्बल 300 वर्षांनी सापडला सोन्याचा खजिना, तोफगोळ्यांच्या हल्ल्यात समुद्रात बुडालेल्या या जहाजाबाबत तुम्ही कधी ऐकलंय का ?

Published on -

तब्बल 300 वर्षांपूर्वी समुद्राच्या गर्भात हरवलेलं आणि जगातलं सर्वात श्रीमंत जहाज मानलं जाणारं ‘सॅन होजे’ अखेर संशोधकांच्या नजरेस पडले. कोलंबियाच्या किनाऱ्यालगत आढळलेलं हे जहाज केवळ सोन्या-चांदीचा साठा म्हणून नाही, तर शतकानुशतकांच्या संघर्षांची साक्ष देणारं स्मारक म्हणूनही महत्त्वाचं ठरतं.

सॅन होजे जहाजाचा इतिहास

हे जहाज 1708 मध्ये इंग्रजांशी झालेल्या समुद्रयुद्धात तोफगोळ्यांच्या भीषण हल्ल्यात बुडालं. त्या स्फोटाच्या क्षणी, जगाच्या सर्वात मोठ्या खजिन्यापैकी एक असलेला जहाज खोल समुद्रात गडप झाला.

सॅन होजे हे एक स्पॅनिश गॅलियन जहाज होतं, जे अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींमधून मौल्यवान संपत्ती घेऊन युरोपकडे जात होतं. त्या प्रवासात सोनं, चांदी आणि रत्ने यांचा अमाप खजिना त्यावर लादलेला होता, सुमारे 200 टनांहून अधिक. पण नियतीनं काहीतरी वेगळंच ठरवलं होतं.

जवळपास तीन शतकं ही कहाणी लोकांच्या आठवणीतच होती. पण 2015 मध्ये कोलंबियन सरकारच्या मोहिमेमुळे एक आश्चर्यकारक सत्य उजेडात आलं. सुमारे 1,970 फूट म्हणजेच जवळपास 600 मीटर खोल समुद्रात हे जहाज सापडलं आणि त्यानंतर सुरू झाल्या संशोधन मोहिमा.

‘कॉब्स’ नाणी-

 

या संशोधनातून सापडलेली नाणी ही खास होती. त्या काळात वापरली जाणारी ‘कॉब्स’ही नाणी या जहाजात आढळली. थोडीशी अनियमित, खडबडीत रचना असलेली ही नाणी हाताने बनवली जात असत. स्पॅनिश भाषेत त्यांना ‘मॅक्युक्विना’ म्हणतात. दोन शतकांहून अधिक काळ स्पॅनिश वसाहतींमध्ये याच नाण्यांचा व्यवहार होत होता.

आजही या जहाजाबाबत चर्चा होत असतात. समुद्रात अशी अनेक जहाजे बुडाली आहेत, जी अजूनही सापडली नाहीत. मात्र, जेव्हा कधी समुद्रातील खजिन्याबाबत बोललं जातं तेव्हा सॅन होजे या जहाजाचं नाव आवर्जून घेतलं जातं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News