भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ देशात मिळते मोफत वैद्यकीय शिक्षण आणि महिन्याला स्टायपेंडही, जाणून घ्या अधिक

Published on -

आजकाल वैद्यकीय शिक्षण घेण्याची स्वप्नं अनेक विद्यार्थी पाहतात, पण अनेकांचे आर्थिक अडचणीमुळे हे स्वप्न अपूर्णच राहते. भारतात एमबीबीएस करण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो, त्यामुळे खूपच कमी विद्यार्थ्यांना ही संधी मिळते. पण जगात एक छोटासा देश आहे, जिथे एमबीबीएसचं संपूर्ण शिक्षण, राहणीमान आणि जेवण अगदी मोफत दिलं जातं. तो देश म्हणजे क्युबा.

लॅटिन अमेरिकन स्कूल ऑफ मेडिसिन

क्युबाची राजधानी हवाना येथील लॅटिन अमेरिकन स्कूल ऑफ मेडिसिन (ELAM) ही जगातील सर्वात मोठी वैद्यकीय शाळा मानली जाते. ही शाळा केवळ देशांतर्गत विद्यार्थ्यांसाठी नाही, तर जगभरातील विशेषतः गरीब आणि कमी संसाधन असलेल्या देशांतील तरुण डॉक्टर घडवण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. आजवर ELAM ने 160 पेक्षा जास्त देशांमधून तब्बल 30,000 हून अधिक डॉक्टर घडवले आहेत.

या संस्थेचं खास वैशिष्ट्य म्हणजे, येथे शिकवणी शुल्क, वसतिगृह, दिवसाचे तीन जेवण, पुस्तकं, गणवेश, बेडिंग आणि आवश्यक वस्तू सर्व काही मोफत दिलं जातं. इतकंच नाही, तर विद्यार्थ्यांना दरमहा 100 क्यूबन पेसो (सुमारे ₹320) स्टायपेंडही दिलं जातं. अर्थात, प्रवासाचा खर्च आणि व्हिसासाठी लागणाऱ्या रकमा विद्यार्थ्यांनी स्वतः भरायच्या असतात.

अटी काय आहेत?

भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे एक मोठं संधीचं दार उघडतं. ELAM मध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET-UG उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये चांगले गुण असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. यासाठी स्पॅनिश भाषा शिकण्याची तयारी असणं गरजेचं आहे, कारण पूर्ण अभ्यासक्रम स्पॅनिश भाषेतच शिकवला जातो.

MBBS हा अभ्यासक्रम 7 वर्षांचा असतो. त्यात 1 वर्ष स्पॅनिश भाषा शिक्षण आणि 6 वर्ष वैद्यकीय शिक्षण असतं. ELAM चं शिक्षण प्रामुख्याने व्यावहारिक अनुभव आणि समुदायाभिमुख सेवा यावर केंद्रित आहे. क्युबामध्ये डॉक्टर-रुग्ण गुणोत्तर अतिशय चांगलं आहे आणि त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थेची जागतिक स्तरावर प्रशंसा होते.

प्रवेश प्रक्रिया कशी असते?

प्रवेश प्रक्रिया क्यूबन दूतावास किंवा अधिकृत एजंटमार्फत सुरू केली जाते. अर्ज दरवर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत भरले जातात. अर्जासोबत वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट, पोलिस क्लिअरन्स आणि शैक्षणिक प्रमाणपत्र सादर करावं लागतं. उमेदवारांची निवड ही त्यांची शैक्षणिक पात्रता आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी बघून केली जाते. काही वेळा मुलाखत किंवा भाषा कौशल्य तपासण्यासाठी चाचणी घेतली जाऊ शकते.

ही शिष्यवृत्ती खास करून गरीब आणि सेवाभावी उद्देश असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरते. मात्र काही अडचणीही आहेत. विशेषतः स्पॅनिश शिकणं, कधीमधी भाषा अडचणींमुळे होणारा गोंधळ, भारतात परतल्यावर MCI/NMC परीक्षेत पास होणं आणि प्रवासाचा खर्च. पण तरीही, शिक्षणाची गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय मान्यता आणि पूर्ण मोफत सेवा यामुळे ELAM सारख्या वैद्यकीय शाळा अनेक विद्यार्थ्यांसाठी उज्वल भविष्याची संधी उघडतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!