परदेशात जाण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. कुणाला लंडन पाहायचंय, कुणाला दुबईचं वैभव अनुभवायचंय, तर कुणाला ऑस्ट्रेलिया. पण प्रत्येक वेळेस त्या स्वप्नामध्ये एक अडथळा ठरत आला आहे, व्हिसा शुल्क! हजारो रुपयांचं हे शुल्क अनेक वेळा परवडत नाही आणि स्वप्न पुन्हा बॅगेत बंद होतं. पण आता एक मोठी बातमी आली आहे जी अनेक भारतीय प्रवाशांसाठी पर्वणी ठरणार आहे.
‘अॅटलिस’ कडून जबरदस्त ऑफर

‘अॅटलिस’ नावाच्या व्हिसा प्रोसेसिंग प्लॅटफॉर्मने भारतीयांसाठी एक अशी योजना आणली आहे जी ऐकून खरं वाटणार नाही, फक्त 1 रुपयांत व्हिसा! होय, अगदी खरं. यूके, यूएई, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांसारख्या 15 प्रमुख देशांचा व्हिसा फक्त एक रुपयात मिळणार आहे. 4 आणि 5 ऑगस्ट या दोन दिवसांसाठी हा खास व्हिसा सेल सुरू करण्यात आला आहे, या सेलमुळे सध्या ट्रॅव्हल प्रेमींमध्ये खळबळ उडालीआहे.
यानंतर एक प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे असं काय विशेष झालं की कंपनीने असा मोठा निर्णय घेतला? यामागे आहे एक गंभीर पार्श्वभूमी. युरोपियन कमिशन आणि Condé Nast Traveller यांच्या अहवालात असं नमूद झालं आहे की 2024 मध्ये भारतीय प्रवाशांनी व्हिसा शुल्काच्या स्वरूपात तब्बल 664 कोटी रुपये गमावले आहेत. हे पैसे म्हणजे नाकारलेल्या व्हिसा अर्जांसाठी भरलेले आणि न परत येणारे शुल्क. यामुळे अनेक प्रवासी आर्थिकदृष्ट्या मार खातात आणि परदेशवारीसाठी पुन्हा विचार करायला लागतात.
अॅटलिसने हे लक्षात घेऊन ही योजना सुरू केली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या ऑफरमध्ये कंपनी फक्त 1 रुपया आकारणार असून बाकीचं सर्व शुल्क आणि सेवा शुल्क स्वतः सरकार उचलणार आहे. यामुळे भारतीय प्रवाशांना एक अनोखी संधी मिळणार आहे, ती म्हणजे अगदी तुटपुंज्या दरात जग पाहण्याची.
सेलमधील सहभागी देश
या सेलमध्ये जे देश सहभागी आहेत त्यात यूके, यूएई, व्हिएतनाम, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, हाँगकाँग, ओमान, मोरोक्को, कतार, केनिया, तैवान, आणि अगदी अमेरिका सुद्धा समाविष्ट आहे. यातील काही देशांमध्ये व्हिसा घेण्यासाठी वैयक्तिक मुलाखती लागतात, पण तरीही कंपनी याच दरात प्रक्रिया करणार आहे.
कुणासाठी असेल संधी?
ही संधी केवळ अनुभवी प्रवाशांसाठी नाही, तर पहिल्यांदाच परदेशवारी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठीही आहे. अॅटलिसने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 60 दिवसांत तरुणांमध्ये व्हिसा सर्च करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. विशेषतः व्हिएतनाम, इंडोनेशिया, जॉर्जिया, यूके आणि यूएईसाठी. ही वाढ 18 ते 44 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे आणि यात बहुसंख्य तरुण हे टियर 1 व टियर 2 शहरांमधील आहेत.
सध्या साध्या व्हिसाच्या शुल्काची जर आपण तुलना केली, तर यूएईसाठी 30 दिवसांच्या व्हिसासाठी सुमारे ₹7,800, तर यूकेसाठी सुमारे ₹15,000 इतकं शुल्क भरावं लागतं. त्यामुळे आता फक्त 1 रुपयात अशा व्हिसाचं स्वप्न पूर्ण होणं, हे खरंच एक मोठं सौभाग्य आहे.