अनेकांना परदेशात जाऊन काम करण्याची इच्छा असते.मात्र, बाहेरच्या देशातील खर्च पाहून हा विचार मागेच पडतो. तर कधी-कधी व्हिसामुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही.मात्र, अशाच लोकांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेला न्यूझीलंड आता भारतीयांसाठी एक अनोखी संधी घेऊन आला आहे. फक्त सुमारे 22,000 रुपयांमध्ये तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकता, आणि रिमोट जॉब करत, त्या स्वर्गसमान देशात काही महिने राहण्याचा अनुभव घेऊ शकता.

हिरव्या डोंगररांगा, स्वच्छ हवामान आणि निवांत जीवनशैली असा न्यूझीलंड म्हणजे निसर्ग आणि शांततेचं गोड मिश्रण. अनेकांसाठी हे केवळ पर्यटन स्थळ नसून आयुष्यभर आठवणीत राहणारा अनुभव असतो. पण आता तुम्ही या सुंदर ठिकाणी राहूही शकता, आणि तेही तुमचं रोजचं काम सोडून न देता.
न्यूझीलंड सरकारची ऑफर काय?
न्यूझीलंड सरकारकडून ‘डिजिटल नोमॅड व्हिसा’ अधिकृतपणे लागू केलेला नसला, तरी त्यांनी त्यांच्या विजिटर व्हिसामध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. म्हणजे, तुम्ही भारतातल्या किंवा इतर देशातल्या एखाद्या क्लायंटसाठी फ्रीलान्स काम करत असाल, किंवा टेक, डिज़ाईन, कन्सल्टिंग यांसारख्या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही न्यूझीलंडमध्ये 6 ते 9 महिने राहून तुमचं काम सुरू ठेवू शकता.
तुमचं मुख्य उद्दिष्ट प्रवास, वैयक्तिक भेटी किंवा थोडा वेळ तिथे वास्तव करणं असायला हवे. मात्र, या व्हिसावर न्यूझीलंडमध्ये स्थानिक नोकरी किंवा स्थानिक व्यवसायांना सेवा देणं याला परवानगी नाही. पण एकाच वेळी प्रवास आणि रिमोट वर्कचा आनंद घ्यायचा असेल, तर ही एक उत्तम संधी आहे.
सिंगल एंट्री व्हिसावर तुम्ही 9 महिनेपर्यंत राहू शकता, तर मल्टीपल एंट्री व्हिसावर 6 महिने. यामध्ये तुम्ही 3 महिनेपर्यंत काही अभ्यासक्रमात सहभागी होण्याचाही पर्याय घेऊ शकता. म्हणजे तिथे राहताना फक्त कामच नाही, तर तुम्ही नवीन कौशल्ये देखील शिकू शकता.
व्हिसासाठी अर्ज करण्याची पद्धत आणि खर्च
व्हिसासाठी अर्ज करणं फारसं गुंतागुंतीचं नाही. तुम्ही इमिग्रेशन न्यूझीलंडच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सगळी प्रक्रिया ऑनलाइन करू शकता. वैध पासपोर्ट, परतीचं तिकीट आणि महिन्याला किमान NZD 1,000 (जवळपास 51,400 रुपये) उत्पन्न किंवा खात्यातील बॅलन्स दाखवणं आवश्यक आहे. जर तुम्ही आधीच निवासाची सोय केली असेल, तर महिन्याला फक्त NZD 400 (सुमारे 20,560 रुपये) पुरेसं मानलं जातं.
या व्हिसासाठी सध्या जुलै 2025 पर्यंतचा एकूण खर्च सुमारे 27,795 रुपये इतका आहे, ज्यामध्ये व्हिसा शुल्क आणि पर्यटन कर (IVL) दोन्हीचा समावेश आहे. हे लक्षात घेतलं, तर हाच तुमच्यासाठी एक स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे, परदेशात राहण्याचा आणि जग पाहत राहण्याचा.
तुम्ही भारतीय असाल, तर NZeTA (इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल अथॉरिटी) तुमच्यासाठी लागू नसेल. त्यामुळे तुम्हाला थेट विजिट व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. अर्ज झाल्यानंतर सहसा 2 ते 3.5 आठवड्यांत त्यावर प्रक्रिया होते.