परदेशात फिरायला जाण्याची इच्छा अनेकांची असते. पण अनेकदा व्हिसा मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रं, वेळ आणि खर्च यामुळे अनेकांचे पाय थांबतात. अशा वेळी जर कोणी सांगितलं की तुम्ही सहज, फक्त पासपोर्ट घेऊन दुसऱ्या देशात जाऊ शकता तेही कोणताही व्हिसा न घेता तर? हो, असाच एक आनंददायक निर्णय श्रीलंका या आपल्या शेजारी देशाने घेतला आहे, आणि त्यामुळे अनेक भारतीय प्रवाशांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आहे.

श्रीलंकाची भन्नाट ऑफर
श्रीलंकेनं अलीकडेच एक मोठं पाऊल उचललं आहे. भारतासह एकूण 40 देशांतील नागरिकांना आता त्यांच्या देशात व्हिसाशिवाय प्रवेश देता येणार आहे. म्हणजेच, तुमच्याकडे वैध पासपोर्ट असेल, तर तुम्ही थेट श्रीलंकेत उतरणार आणि त्या देशाच्या सौंदर्याचा अनुभव घेणार, तेही कोणताही अतिरिक्त व्हिसा शुल्क न भरता. ही योजना आधी काही निवडक 7 देशांपुरती मर्यादित होती, पण आता श्रीलंकेनं ही सुविधा विस्तारित करत अधिक पर्यटकांना आकर्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामागचं कारणही स्पष्ट आहे. श्रीलंकेला काही काळापूर्वी मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा बळ देण्यासाठी पर्यटनावर भर देण्याचा मार्ग निवडण्यात आला. देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी याविषयी सांगितलं की 2023 मध्ये सुरुवात झालेल्या या योजनेतून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळेच आता तिचा अधिकृत विस्तार करण्यात आला आहे. अंदाजे 550 कोटी रुपयांच्या व्हिसा शुल्काचं नुकसान सरकारला होणार असलं, तरी वाढत्या पर्यटकांमुळे हे नुकसान भरून निघेल, असा विश्वास श्रीलंकन अधिकाऱ्यांना आहे.
व्हिसा फ्री ट्रॅव्हल म्हणजे?
व्हिसा फ्री ट्रॅव्हल म्हणजे काय, हेही समजून घेण्यासारखं आहे. यात तुम्हाला त्या देशात प्रवेश करण्यासाठी वेगळा व्हिसा घ्यावा लागत नाही. फक्त तुमचा पासपोर्ट आणि विमानाचं तिकीट पुरेसं ठरतं. यामुळे वेळ, कागदपत्रं, इंटरव्ह्यू किंवा इतर त्रास नकोसा होतो. त्यातच श्रीलंकेसारख्या देशात गेल्यावर, जेव्हा तुम्ही तिथलं चलन भारतीय रुपयांच्या तुलनेत खूपच कमी असल्याचं अनुभवता (1 INR सुमारे 3.46 श्रीलंकन रुपये), तेव्हा खिशावर फारसा ताणही येत नाही आणि त्यामुळे अनेक भारतीय प्रवासी तिथे स्वतःला अक्षरशः ‘करोडपती’सारखं समजू लागतात.
श्रीलंकामधील आकर्षक पर्यटनस्थळे
श्रीलंका हा एक छोटा पण विविधतेनं भरलेला देश आहे. समुद्रकिनाऱ्याची शांतता, डोंगररांगा, प्राचीन मंदिरं, बौद्ध संस्कृतीचं तेज, आणि उत्कृष्ट सी-फूड या सगळ्याचा अनुभव एकाच प्रवासात घेणं इथे शक्य आहे. सिगिरिया रॉक फोर्ट्रेससारखं ऐतिहासिक स्थळ, अनुराधापुरासारखा सांस्कृतिक ठेवा, आणि डंबुल्ला गुहामंदिरांमधील अध्यात्मिक शांतता – या साऱ्यांमुळे तुमचा श्रीलंकेतील प्रत्येक क्षण संस्मरणीय ठरतो.
पुढे मिरिसा आणि बेंटोटा सारख्या ठिकाणांवर नजर टाकली, तर सर्फिंग, सनबाथ, जलक्रीडा आणि निसर्गाच्या सहवासात राहण्याचा अनुभव मिळतो. विशेषतः बेंटोटामधल्या लक्झरी रिसॉर्ट्स आणि बॅकवॉटर टूर हा प्रवास जणू स्वप्नवत वाटतो.
म्हणूनच, जर तुम्ही परदेशात कमी बजेटमध्ये जाऊन अधिक अनुभव घेण्याचा विचार करत असाल, तर श्रीलंका तुमच्यासाठी अगदी परिपूर्ण ठिकाण ठरू शकतं. व्हिसाचा झंझट नाही, खर्चाचा भार नाही, आणि अनुभव मात्र भरपूर.