रोजच्या धावपळीत केसांवर लक्ष देणं अनेकजण विसरून जातात. वेळेअभावी किंवा कंटाळ्यामुळे अनेक लोक केसांना नियमित तेल लावत नाहीत. पण ही सवय तुमच्या केसांसाठी काळजीचं कारण बनू शकते. तुम्हाला वाटत असेल की फक्त शॅम्पू आणि कंडिशनर लावून केसांची काळजी होते, पण वास्तव वेगळं आहे. केसांना तेल लावणं ही केवळ एक पारंपरिक पद्धत नाही, तर ही काळजी घेण्याची सर्वात नैसर्गिक आणि प्रभावी पद्धत आहे.

जेव्हा तुम्ही केसांना नियमितपणे तेल लावत नाही, तेव्हा सर्वप्रथम परिणाम दिसतो तो म्हणजे केसांची मुळे कमकुवत होणं. केसांना जे पोषण टाळूच्या मुळांपासून मिळायला हवं, ते न मिळाल्यामुळे केस पातळ होतात, तुटतात आणि गळायला लागतात. याचा परिणाम म्हणून केसांची घनता कमी होते आणि अनेकांना अकाली टक्कल येण्याची भीती सतावते.
टाळूला तेल लावणं आवश्यक
त्याचवेळी, टाळूही या दुर्लक्षाचा बळी ठरते. तेल टाळूला आवश्यक ओलावा देतं. पण जर तेच नसेल तर टाळू कोरडी पडते, खाज सुटते आणि कधी कधी जळजळही जाणवते. अशा स्थितीत कोंडाही वाढतो आणि केस अधिक अस्वस्थ वाटतात. कोंडा एकदाच वाढला, की तो केसांच्या आरोग्यावरही परिणाम करतो आणि त्यांच्या गळतीत भर घालतो.
एक फारच लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केस लवकर पांढरे होणं. हे अनेकांना वयाच्या फार आधी अनुभवायला लागतं. पण यामागेही एक मोठं कारण म्हणजे केसांना मिळणारं पोषण कमी होणं. तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि आवश्यक फॅटी अॅसिड हे केसांच्या रंगद्रव्याचं रक्षण करतात. पण जेव्हा तेल लावणं थांबतं, तेव्हा केस सहजपणे रंग बदलतात आणि राखाडी होऊ लागतात.
तेल न लावल्याचे परिणाम
त्याशिवाय, केसांचं सौंदर्यसुद्धा झपाट्याने कमी होतं. तेल न लावल्यामुळे केस कोरडे, फाटलेले, गोंधळलेले वाटतात. केसात पूर्वीसारखा मऊपणा आणि नैसर्गिक चमक उरत नाही.एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टाळूतील रक्तप्रवाह. जेव्हा तुम्ही केसांना हलक्या हाताने तेल लावता, तेव्हा तेवढ्या साध्या मालिशनेही टाळूतील रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे केसांची वाढ जलद होते. पण जर हेच टाळलं गेलं, तर केस वाढण्याची नैसर्गिक गती थांबते आणि केस कोरडे (ड्राय) पडतात.
तसेच वातावरणात प्रदूषण, उष्णता आणि धूळ हे केसांसाठी मोठं आव्हान आहेत. तेल हे केसांवर एक नैसर्गिक कवच तयार करतं, जे त्यांना या सर्व बाह्य घटकांपासून वाचवतं.त्यामुळे केसांचं खरं आरोग्य आणि सौंदर्य राखायचं असेल, तर तेल ही गोष्ट टाळणं योग्य नाही. दर आठवड्यातून किमान दोन वेळा, केसांना योग्य प्रकारे तेल लावणं ही सवय पुन्हा अंगीकारली पाहिजे.