व्यवसाय करताना मेहनतीनं कमाई जोडणं हे जितकं कठीण, तितकंच वेळेवर पेमेंट मिळणंही एक आव्हानच असतं. खरेदीदार समाधानानं वस्तू घेतो, सेवा घेतो, पण पैसे देताना त्याचं वेळापत्रक कधी बदलतं, हे कुणालाच कळत नाही. अशा वेळी, आपल्या मनात चिंता, अस्वस्थता आणि आर्थिक गोंधळ निर्माण होतो. पण एखादी गोष्ट सतत अडथळ्यांतून जात असेल, तर फक्त व्यवहारिक उपायच नव्हे तर थोडं आध्यात्मिक किंवा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहणंही गरजेचं ठरतं.

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार, घरात किंवा ऑफिसमध्ये आर्थिक प्रवाहाचा संबंध विशेषतः आग्नेय दिशेशी जोडलेला आहे. ही दिशा ‘अग्नि’ तत्वाचं प्रतिनिधित्व करते. आग्नेय दिशेतील योग्य उर्जा प्रवाहाचा व्यवसायावर थेट परिणाम होतो असं मानलं जातं. जर ही दिशा निष्क्रिय असेल, किंवा अनावश्यक वस्तूंनी भरलेली असेल, तर पैशाचा प्रवाह अडतो, आणि महिन्यांपासून थांबलेले पेमेंट्स पुढे ढकलले जातात.
‘लाल घोड्यांचं चित्र’
अशा वेळी एक प्रभावी उपाय म्हणजे ‘लाल घोड्यांचं चित्र’. वास्तुनुसार, लाल रंग हे उर्जेचं, जोशाचं आणि गतीचं प्रतीक आहे. चार किंवा सात लाल घोडे एकाच दिशेने धावताना दाखवणाऱ्या चित्राचा उपयोग केल्यास अडकलेले पैसे गतीने मिळायला लागतात, असं मानलं जातं. हे चित्र तुमच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावं. पण लक्षात ठेवा, घोडे कधीही पाठमोरे नसावेत. ते समोरून पुढे धावताना दिसले पाहिजेत. हाच तो गतीचा संदेश, जो तुमच्या व्यवहारांमध्ये सकारात्मक हालचाल घडवून आणतो.
पण फक्त घोड्याचं चित्र लावणं पुरेसं नाही. ज्या कोपऱ्यात हे चित्र ठेवण्यात येतं, तो कोपरा स्वच्छ, नीट आणि मोकळा असणं अत्यंत गरजेचं आहे. दिवसातून एकदा तरी हा भाग झाडणं, पुसणं आणि अनावश्यक वस्तूंना तिथून हटवणं या साध्या गोष्टी उर्जेला जागृत करतात. काही वेळा आपल्या लक्षातही येत नाही, पण धूळ, जुन्या वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक स्क्रॅप आर्थिक अडथळ्यांचं कारण ठरतात.
योग्य दिशा निवडणे आवश्यक
तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये अगदी योग्य दिशा शोधण्यासाठी एक साधं पण उपयोगी साधन आहे, कम्पास. त्याच्या मदतीनं तुम्ही अगदी अचूक आग्नेय दिशा शोधू शकता आणि मग या दिशेसंबंधी उपाय करू शकता. एकदा दिशा समजली की, लाल घोड्यांचं चित्र भिंतीवर लावावं किंवा पुतळा शेल्फवर ठेवा. आणि दर आठवड्याला या जागेची स्वच्छता करायला विसरू नका. कारण उर्जा जितकी जागृत ठेवता, तितकं तिचं काम लवकर सुरू होतं.
या उपायाचा परिणाम किती लवकर दिसेल, हे प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. पण अनेक वेळा असं पाहण्यात आलंय की महिन्यांपासून थांबलेले पैसे एका आठवड्यातच खात्यात जमा होतात. जुने ग्राहक स्वतःहून संपर्क करतात, नवीन संधी समोर येतात आणि व्यवसायाला एक नवचैतन्य लाभतं.