अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची भव्यता सर्वश्रुत आहे, पण भारताच्या दक्षिण भागात एक असे मंदिर आहे, ज्यामधील झळाळी त्याहीपेक्षा दुप्पट आहे. हे मंदिर म्हणजे तामिळनाडू राज्यातील वेल्लोर येथील श्री लक्ष्मी नारायणी सुवर्ण मंदिर. हे मंदिर केवळ त्याच्या धार्मिक महत्त्वासाठी नव्हे, तर त्याच्या सोन्याच्या अलंकारासाठीही प्रसिध्द आहे. येथे इतके सोने वापरले गेले आहे की, क्षणभर वाटते आपण कुबेराच्या खजिन्याच्या दरवाज्यावर उभे आहोत.

श्री लक्ष्मी नारायणी सुवर्ण मंदिर
या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा संपूर्ण बाह्य भाग शुद्ध सोन्याने मढवलेला आहे. मंदिराचा विमान आणि अर्धमंडप हे भाग विशेषतः सोन्याच्या पत्र्यांनी झाकलेले आहेत. हे संपूर्ण मंदिर श्री नारायणी पीडम संस्थेने उभारले असून, त्यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शक शक्ती अम्मा यांनी या भव्य प्रकल्पाचे नेतृत्व केले. मंदिराच्या भिंतींवर वैदिक शिक्षणाचे शिल्पात्मक कोरीवकाम केले गेले आहे, जे पाहताना पर्यटक मंत्रमुग्ध होतात.
हे सुवर्ण मंदिर सुमारे 100 एकर जागेवर उभे आहे. तिरुपतीपासून 120 किमी आणि चेन्नईपासून 145 किमी अंतरावर असलेले हे मंदिर श्री महालक्ष्मीला अर्पण केले गेले आहे. संपत्तीची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मीचा झगमगता दरबार येथे पाहायला मिळतो.
1500 किलो सोन्याचा वापर
या मंदिरात एकूण 1,500 किलो शुद्ध सोन्याचा वापर झाला आहे. अहवालांनुसार मंदिराच्या सोन्याच्या थरांची संख्या 9 ते 10 आहे. या तुलनेत, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात केवळ 750 किलो सोने वापरले गेले आहे. म्हणजेच वेल्लोरच्या मंदिरात दुप्पट सोन्याचा वापर झाला आहे.
या भव्यतेमुळेच जगभरातून भाविक आणि पर्यटक येथे आकर्षित होतात. लोक येथे केवळ प्रार्थनेसाठीच नाही, तर या आश्चर्यकारक सौंदर्य आणि अध्यात्मिक अनुभूतीसाठीही गर्दी करतात. हे मंदिर एकात्मतेचे, समृद्धीचे आणि भारतीय शिल्पकलेच्या परंपरेचे प्रतीक ठरते.