पर्सनल लोन घेतलंय? मग हे 5 स्मार्ट फॉर्म्युले तुमचा EMI करतील कमी; महिन्याला होईल हजारोंची बचत!

Published on -

आजच्या वेगवान जीवनशैलीत अनेकांना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घ्यावे लागते. लग्नसमारंभ असो, वैद्यकीय खर्च, शिक्षणासाठीची आवश्यकता किंवा कोणतीही आकस्मिक गरज वैयक्तिक कर्ज एक झटपट उपाय ठरतो. मात्र हे जितके सहज मिळते, तितकेच त्याचे मासिक हप्ते म्हणजेच ईएमआय परतफेड करणे अनेकांसाठी मोठ्या डोकेदुखीचे कारण ठरते, विशेषतः जेव्हा कर्जावरील व्याजदर जास्त असतो.

सध्या बऱ्याच बँका आणि फायनान्स कंपन्या सहज कर्ज उपलब्ध करून देतात, पण त्याबरोबर येणाऱ्या हप्त्यांचा भार खिशाला चांगलाच चिमटा घेतो. यातून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे आणि शहाणपणाचे मार्ग आहेत, जे तुमच्या मासिक बजेटमध्ये थोडा श्वास घेण्यास मदत करू शकतात.

प्री-पेमेंट

सर्वात प्रभावी उपायांपैकी एक म्हणजे ‘प्री-पेमेंट’. जर तुमच्याकडे बोनस, गुंतवणुकीतून परतावा किंवा साइड इनकमसारखा अतिरिक्त पैसा उपलब्ध झाला असेल, तर त्याचा वापर थेट कर्जाच्या मुख्य रकमेवर करून टाका. यामुळे कर्जाची एकूण मुदत आणि ईएमआय दोन्ही कमी होतात. एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस बँक यांसारख्या अनेक बँका ही सुविधा देतात, पण त्यावर काही वेळा लहान शुल्क आकारले जाते, त्यामुळे आधी नियम समजून घेणे आवश्यक ठरते.

कर्जाची मुदत

जर तुम्हाला वाटत असेल की मासिक हप्ता फारच जास्त आहे आणि सध्याच्या उत्पन्नात तो फिट बसत नाही, तर कर्जाची मुदत वाढवण्याचाही विचार करता येतो. यामुळे हप्ता कमी होतो, मात्र एकूण व्याज मात्र वाढते, त्यामुळे हा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागतो.

‘बॅलन्स ट्रान्सफर’

काहीजण बँक बदलण्याचाही पर्याय निवडतात. जिथे कमी व्याजदरात कर्ज मिळते तिथे ‘बॅलन्स ट्रान्सफर’ करून EMI मध्ये थोडी घट केली जाऊ शकते. मात्र हे करताना नवीन बँकेचे प्रोसेसिंग फी, अटी आणि व्याजदर यांचं नीट परीक्षण करणं आवश्यक आहे.

‘स्टेप-डाउन ईएमआय’

काही बँका ‘स्टेप-डाउन ईएमआय’ योजना देतात. यामध्ये सुरुवातीला हप्ते थोडे जास्त असतात, पण नंतर ते हळूहळू कमी होत जातात. ज्यांचं सध्याचं उत्पन्न अधिक आहे आणि भविष्यात ते आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

क्रेडिट स्कोअर

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर. जर तो 750 पेक्षा अधिक असेल, तर तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे वेळेवर बिल भरत राहणे, जुनी कर्जं पूर्णपणे फेडणे आणि क्रेडिट कार्डचा विचारपूर्वक वापर करणे या सवयी अंगीकाराव्यात.

एकूणच बघितलं तर वैयक्तिक कर्जाचा EMI कमी करण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत नाही. थोडेसे नियोजन, योग्य वेळेवर घेतलेले निर्णय आणि स्वतःच्या आर्थिक क्षमतेची जाणीव ठेवल्यास, तुमचे मासिक हप्ते सहज पेलवण्याजोगे होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!