पोस्ट ऑफिसची एक अशी योजना आहे, जी नुसती सुरक्षित नाही, तर दरमहा चांगले उत्पन्नही देते. अनेकजण निवृत्तीनंतरच्या काळासाठी अशा स्थिर आणि हमखास परतावा देणाऱ्या पर्यायाचा शोध घेत असतात. अशावेळी ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच Senior Citizens Savings Scheme (SCSS) हे एक असे गुंतवणुकीचे साधन आहे जे न केवळ सुरक्षित आहे, तर त्यातून दरमहा 20,500 रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते. आणि विशेष म्हणजे, ही योजना बँक एफडीपेक्षा जास्त परतावा देते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना
भारतीय कुटुंबांमध्ये उद्याची चिंता ही कायम असते. काही लोक तर असे वाटून थांबतात की आता वय झालं, कमाई थांबली, आणि खर्च वाढला. पण SCSS सारख्या योजनांमुळे निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्नाचा प्रवाह सुरू ठेवता येतो. ही योजना मुख्यत्वे 60 वर्षांवरील नागरिकांसाठी असली तरी काही विशेष अटींसह 55 वर्षांवरील VRS घेणारे किंवा संरक्षण खात्यातून निवृत्त झालेल्यांनाही गुंतवणुकीची संधी देते.
या योजनेची खासियत म्हणजे तुम्हाला दर तिमाहीला म्हणजेच 3 महिन्यांनंतर व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कम मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्ही या योजनेत 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला प्रत्येक तिमाहीला 61,500 रुपये व्याज मिळेल. म्हणजे दर महिन्याला जवळपास 20,500 रुपये. वर्षभरात ही रक्कम 2,46,000 रुपयांवर पोहोचते. आण ही रक्कम तुमच्या बचत खात्यात थेट जमा होते तीही तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या खात्यात.
8.20% वार्षिक व्याज
सध्या या योजनेवर 8.20% वार्षिक व्याज दिलं जात आहे. सरकारी योजना असल्याने पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. एकट्या व्यक्तीसाठी गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे. पण जर जोडप्याने दोघांनी स्वतंत्रपणे गुंतवणूक केली, तर त्यांचं एकत्रित मासिक उत्पन्न 41,000 रुपयांवर जाऊ शकतं. यामध्ये आयकर कायद्यानुसार कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवता येतो पण ही सूट फक्त जुन्या कर प्रणालीमध्ये लागू होते.
योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. नंतर तुम्हाला हवा असेल तर 3 वर्षांसाठी वाढवता येतो. मात्र, जर तुमच्या गरजा बदलल्या आणि तुम्हाला वेळेपूर्वी पैसे काढावेसे वाटले, तर त्यासाठी काही अटी आहेत. एक वर्षाच्या आत पैसे काढल्यास व्याज मिळणार नाही. एका वर्षानंतर, ठेवीच्या रकमेवर 15% दंड आणि 2 वर्षांनंतर 1% दंड आकारला जातो.