भारताच्या इतिहासात अनेक सम्राट होऊन गेले, पण चंद्रगुप्त मौर्य हे नाव वेगळ्या कारणासाठी नेहमीच चर्चेत राहतं. चाणक्यांच्या सहकार्याने संपूर्ण भारताचे एकीकरण करणारा हा राजा केवळ पराक्रमी नव्हता, तर त्यांची जीवनशैली, राज्यव्यवस्थापन आणि कामाची निष्ठा ही आधुनिक प्रशासनासाठीही मार्गदर्शक ठरू शकते.


चंद्रगुप्त मौर्य यांनी भारतात प्रथमच एक मजबूत आणि एकत्रित साम्राज्य उभारले. चाणक्य यांच्या कुशाग्र बुद्धीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अलेक्झांडरच्या सैन्याचा पराभव केला आणि भारताच्या इतिहासात पहिला महा सम्राट म्हणून स्थान मिळवले. अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत पसरलेल्या या साम्राज्याचे कारभार इतक्या काटेकोरपणे चालवले जात होते की, सम्राटाला झोपेसाठी देखील फारसा वेळ मिळत नसे.

चंद्रगुप्त मौर्य यांची दिनचर्या

चाणक्यनीतीनुसार शासकाने सूर्योदयाच्या आधी उठून आपल्या राज्याच्या कामाचा आढावा घ्यावा, अशी शिकवण चंद्रगुप्त मौर्य यांनी कटाक्षाने पाळली. रात्री लवकर झोपण्याची सवय असली तरी त्यांचे काम इतकं असायचं की, त्यांना प्रत्यक्ष झोपेसाठी सुमारे 6 तासच मिळत असत.

इतकंच नव्हे, तर ते मालिश करतानाही हेरांशी संवाद साधून महत्वाचे निर्णय घेत. गुप्तचर यंत्रणा त्यांच्या कारभाराचा अत्यंत महत्वाचा भाग होती. कोणत्याही संभाव्य धोका किंवा बंडखोरीची माहिती मिळताच, चंद्रगुप्त तत्काळ निर्णय घेत. अशा प्रकारे त्यांनी वेळेचा अत्यंत योग्य वापर केला.

त्यांच्या वैयक्तिक जीवनावर राज्यकारभाराचा इतका प्रभाव होता की, स्वतःसाठी वेळ मिळणं हे दुर्मीळ होतं. मात्र, चाणक्य यांनी त्यांच्या वैयक्तिक वेळेचंही नियोजन केलं होतं, जेणेकरून सम्राटाला निर्णय घेण्यासाठी शांतीत विचार करता यावा.

चंद्रगुप्त मौर्य यांचं आयुष्य आणि कार्यशैली आजही प्रेरणादायक आहे. त्यांनी दाखवलेला शिस्तबद्ध जीवनक्रम, वेळेचं नियोजन आणि राष्ट्रप्रेम याची आजही दखल घेतली जाते. त्यांच्या भव्य साम्राज्याच्या यशामागे त्यांचं कठोर परिश्रम, तडजोड न करणारी कार्यशैली आणि सतत कार्यक्षम राहण्याची वृत्ती होती.