कधी काळी लोकांनी उत्सव साजरे केलेली, बाजारांनी गजबजलेली, आणि संस्कृतीने समृद्ध असलेली काही शहरे आज समुद्राच्या खोल पाण्याखाली शांतपणे झोपलेली आहेत. या शहरांची आठवण म्हणजे काळाच्या ओघात हरवलेल्या इतिहासाचा एक थरारक आणि भावनांनी भरलेला अध्याय. काही नैसर्गिक आपत्तीमुळे तर काही मानवी गरजांमुळे, ही शहरे एकामागोमाग एक समुद्राच्या तळाशी जाऊन बसली. पण त्यांच्या भिंती, रस्ते, मंदिरे आणि राजवाडे अजूनही पाण्याखाली आपल्या कथा सांगत आहेत.
इटलीचं बाया शहर
इटलीचं बाया हे शहर त्याकाळी एक प्रकारचं समृद्ध आणि आलिशान रोमन पर्यटनस्थळ होतं. गरम पाण्याचे झरे, भव्य राजवाडे आणि राजांपासून ते श्रीमंत व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतं ठिकाण. पण ज्वालामुखीखालची जमीन हळूहळू खचत गेली आणि एक दिवस हे झगमगणारं शहर समुद्रातच गडप झालं. आज ते पाहायचं असेल, तर पाण्याखाली डुबकी मारावी लागते. स्कूबा डायव्हिंगमधून. तिथं गेलेल्यांना आजही मोडकळीस आलेल्या शिल्पांमध्ये तो वैभवशाली भूतकाळ दिसतो.
इजिप्तचं थोनिस-हेराक्लिय शहर
इजिप्तचं थोनिस-हेराक्लियन हे शहर ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतीच्या संगमाचं प्रतीक होतं. कधीकाळी अत्यंत महत्त्वाचं व्यापारी बंदर असलेलं हे शहर, नाइल नदीच्या मार्गात झालेल्या बदलामुळे मातीखाली गाडलं गेलं आणि शेवटी संपूर्णपणे पाण्याखाली. हरक्यूलिस या ग्रीक नायकाने या शहरातूनच इजिप्तमध्ये प्रवेश केल्याचा उल्लेख आहे. पण आज हे शहर फक्त संशोधकांच्या आणि इतिहासप्रेमींच्या आठवणीत उरलं आहे.
इंग्लंडमधील डेरवेंट शहर
इंग्लंडमधील डेरवेंटचं बुडणं थोडं वेगळं होतं. इथं माणसानेच निसर्गाच्या गरजेसाठी एक शहर पाण्यात गाडून टाकलं. 1930च्या दशकात पाण्याची गरज इतकी वाढली की एक जलाशय बांधण्यासाठी हे संपूर्ण शहर बुडवण्यात आलं. आजही पाण्याचा पातळी खाली गेली, की चर्चचा टॉवर आणि इतर इमारती येथे दिसून येतात.
व्हिला एपिक्युएन
दुसऱ्या बाजूला, अर्जेंटिनामधील व्हिला एपिक्युएन हे तलावाच्या काठी वसलेलं एक भव्य रिसॉर्ट टाउन होतं. इथलं पाणी औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध होतं आणि हजारो पर्यटक इथे आरामासाठी यायचे. पण 1985 साली आलेल्या एका प्रलयंकारी पुरामुळे संपूर्ण शहर 10 मीटर खोल खाऱ्या पाण्यात गडप झालं. तब्बल 25 वर्षांनी, 2009 मध्ये पाणी सुकलं आणि या शहराचे काळवंडलेले, विरघळलेले अवशेष पुन्हा सूर्यप्रकाशात दिसू लागले.
पोर्ट रॉयल शहर
शेवटचं उदाहरण म्हणजे पोर्ट रॉयल, जमैकाचं एकेकाळचं समृद्ध आणि कुप्रसिद्ध शहर. 17व्या शतकात हे शहर व्यापाराचं केंद्र होतं आणि समुद्री चाच्यांचं अड्डंही. पण 1692 मध्ये आलेल्या भूकंपाने आणि त्सुनामीने काही मिनिटांतच संपूर्ण शहर समुद्रात गडप केलं. आजही त्याचे भग्नावशेष समुद्राच्या खोल पाण्यात लपलेले आहेत, ज्यांचं अस्तित्व एक काळोखी, पण महत्त्वाची गोष्ट सांगतं.
ही शहरे आता इतिहास आहेत, पण त्यांमध्ये एकेकाळी जिवंतपणे राहणारी लाखो माणसं होती. त्यांच्या आयुष्यातली सुखदु:ख, स्वप्नं, आठवणी, सण, आणि अगदी रोजचं जगणं. निसर्गाच्या एका क्षणिक बदलाने हे सगळं पाण्याखाली गेलं, आणि इतिहासाने हे शहरे एका अध्यायात बंद करून टाकले.