जपानसारख्या देशाचा विचार केला की आपल्या डोळ्यांपुढे एक यंत्रशिस्तप्रिय, अत्याधुनिक तंत्रज्ञानात निपुण आणि संकटांशी झुंज देण्याची विलक्षण तयारी असलेला समाज उभा राहतो. पण जेव्हा आपण जाणतो की हा देश वर्षभरात 1,500 ते 2,000 भूकंपांचा सामना करतो, म्हणजेच दररोज सरासरी 4 ते 6 भूकंप तेव्हा या लोकांच्या सहनशीलतेचं आणि यंत्रणेच्या काटेकोर व्यवस्थापनाचं खरंच कौतुक वाटतं. एकीकडे निसर्ग सतत हादरत राहतो, आणि दुसरीकडे तिथले नागरिक शांतपणे आपल्या रोजच्या जीवनात व्यस्त असतात. हे शक्य होतं कारण जपानने भूकंप हा जीवनाचा एक भाग मानून, त्याला सामोरे जाण्याची प्रत्येक पातळीवर तयारी केली आहे.

जपान ज्या भौगोलिक स्थळी वसलेला आहे, तिथे अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात. त्यामुळे इथं भूकंप हे काही नवलाचं नाही. हे देशाचं वास्तव आहे. पण त्यातूनच या देशाने शिकलंय, संकट टाळता येत नसतात, पण त्यासाठी तयार राहता येतं. त्यामुळे जपानी नागरिकांना भूकंपाची चाहूल लागली, की त्यांचं मन अगदी सज्ज असतं. कारण त्यांनी वर्षानुवर्षे या संकटाचा सामना करत अनुभव कमावला आहे.
अलीकडेच, रशियाच्या कामचटका परिसरात 8.8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्याच्या लाटांचा धोका जपानपर्यंत पोहोचू शकतो, याचा अंदाज घेताच तात्काळ इशारे देण्यात आले. पण जपानने नेहमीप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने प्रतिक्रिया दिली. हे काही नवं नाही, कारण जपानमध्ये मोठ्या भूकंपांबरोबरच छोट्या हादऱ्यांचंही चक्र सतत सुरूच असतं.
या देशात येणाऱ्या अनेक भूकंपांची तीव्रता सौम्य असते 3 ते 5 रिश्टर स्केलच्या दरम्यान. मात्र जेव्हा ती तीव्रता 7 किंवा त्याहून अधिक असते, तेव्हा संकटाचं स्वरूप गंभीर होतं. अशावेळी नुकसान टाळण्यासाठी इमारतींची रचना, आपत्कालीन यंत्रणा आणि लोकांच्या मानसिक तयारीचा कस लागतो. पण याबाबतीत जपाननं एक मजबूत आणि ठोस पायाभूत व्यवस्था उभी केली आहे.
भूकंप प्रतिरोधक तंत्रज्ञान
जपानी बांधकामशास्त्रात भूकंप प्रतिरोधक तंत्रज्ञान ही एक गरज आहे, पर्याय नाही. घरं, शाळा, कार्यालयं प्रत्येक ठिकाणी इमारतींचं बांधकाम अशा प्रकारे केलं जातं की त्या भूकंपाचे हादरे झेलू शकतील. कठोर नियम, नियमित तपासण्या आणि स्थानिक प्रशासनाचा काटेकोर अंमलबजावणीमुळे ही व्यवस्था विश्वासार्ह झाली आहे.
‘सेन्सर’वर चालणारी बुलेट ट्रेन
याचबरोबर, वाहतूक व्यवस्थेतही भूकंपाचा विचार केलेला आहे. जपानमधल्या बुलेट ट्रेनसारख्या जलदगती गाड्या सुद्धा भूकंपाच्या वेळी थांबण्याची क्षमता बाळगून आहेत. देशभर पसरलेले सेन्सर काही सेकंद आधीच धक्का ओळखतात आणि गाड्या आपोआप थांबतात. हे केवळ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नाही, तर त्या परिस्थितीत गोंधळ टाळण्यासाठी देखील महत्त्वाचं आहे.
दरमहा भूकंप कवायती
शाळांमध्ये महिन्याच्या महिन्याला भूकंप कवायती घेतल्या जातात. लहान मुलांना शाळेपासूनच “धक्का बसल्यावर काय करावं?” हे शिकवलं जातं. टेबलाखाली लपणे, डोके झाकणे, शांत राहणे ही पद्धत तोंडपाठ असते. त्यामुळे खरी आपत्ती आली, तरी घबराट कमी होते.
भूकंप बचाव किट्स
घराघरांत भूकंप बचाव किट्स तयार असतात. यात टॉर्च, पाणी, अन्नपदार्थ, मास्क, रेडिओ आणि काही पैसेही असतात. ही गोष्ट फार लहान वाटू शकते, पण जेव्हा आपत्ती अचानक येते, तेव्हा हे किट्सच जीवन वाचवतात.
भूमिगत जलवाहिन्या
पावसाळ्यात किंवा त्सुनामीच्या वेळी टोकियोसारख्या शहरांत पाणी रस्त्यांवर साचत नाही, यामागे ही त्यांची योजनेची दूरदृष्टी आहे. भूमिगत जलवाहिनी बोगद्यांमुळे हे पाणी शहराबाहेर नेलं जातं, आणि त्यामुळे शहरात हालचाल ठप्प होत नाही.
मदतीसाठी तत्परता
संकटात एकत्र येऊन मदत करणं ही जपानमधली संस्कृती आहे. 2011 मध्ये जेव्हा भीषण त्सुनामी आली, तेव्हा लाखो लोकांनी आपापसात हात दिले. अन्न वाटप, निवारा शोधणे, मानसिक आधार देणे हे सगळं लोकांनी स्वतःहून केलं. आणि त्याच अनुभवातून जपानने आपली तयारी अजून मजबूत केली.
इतर उपाय
अलीकडच्या भूकंपात, किनाऱ्यावरील भिंती, पाण्याचा योग्य निचरा, अणुऊर्जा प्रकल्पात खबरदारीचे उपाय या सगळ्यामुळे फारशी हानी झाली नाही. भूकंपाच्या काही सेकंदात फुकुशिमासारख्या अणुऊर्जा प्रकल्पात आपत्कालीन प्रक्रिया कार्यान्वित होते. थेट शटडाउन, रेडिओ अॅक्टिव्हिटी मोजणी, कर्मचारी सुरक्षिततेसाठी पावले यामुळे मोठा धोका टळतो.
तसेच त्सुनामीपासून बचावासाठी जपानच्या समुद्रकिनाऱ्यांवर विशाल सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. या लाटा थोपवतात आणि अंतर्गत भागात पाणी शिरण्यापासून वाचवतात.
यातून स्पष्ट दिसतं की, भूकंप जपानसाठी नवीन गोष्ट नाही, पण त्यावर मात करण्याची कला त्यांनी वर्षानुवर्षे आत्मसात केली आहे.