रेल्वेच्या जनरल कोचबद्दल आपल्याला सर्वांना एखादी आठवण नक्कीच असेल.कधी कॉलेजच्या ट्रिपसाठी, कधी घरच्या गावी जायचं असल्याने, तर कधी फक्त खिशाला परवडेल म्हणून. पण या डब्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात लोक रोजच्या रोज प्रवास करत असतील याचा आपण कधी विचार केला आहे का?

भारतीय रेल्वेने नुकताच एक आकडेवारी अहवाल प्रसिद्ध केला आणि त्यात दिलेली संख्या पाहून खरोखर थक्क व्हायला होतं. 2020-21 ते 2024-25 या पाच आर्थिक वर्षांच्या कालावधीत तब्बल 2,187 कोटी प्रवाशांनी जनरल कोचमध्ये प्रवास केला आहे. ही संख्या ऐकून क्षणभर विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे!
गेल्या 5 वर्षांची आकडेवारी
2020-21 या कोविडच्या पहिल्या वर्षात 99 कोटी प्रवासी जनरल कोचमधून प्रवास करत होते. 2021-22 मध्ये ही संख्या वाढून 275 कोटी झाली. त्यानंतर 2022-23 मध्ये ती 553 कोटीवर पोहोचली. 2023-24 मध्ये ही संख्या 609 कोटी झाली आणि 2024-25 मध्ये ती आणखी वाढून 651 कोटीवर पोहोचली. याचा सरासरी हिशेब घेतल्यास दरवर्षी जवळपास 400 कोटी लोक जनरल कोचमधून प्रवास करत आहेत.
हे सगळं लक्षात घेऊनच रेल्वे मंत्रालयाने 2024-25 मध्ये अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये 1,250 नवीन जनरल कोच जोडले आहेत. ही वाढ फक्त सुविधांपुढे झुकलेली नसून, ती गरजांच्या ओळखीतून आली आहे. देशाच्या विविध भागांतील लाखो सामान्य नागरिकांसाठी हे कोच म्हणजे त्यांच्या प्रवासाचं प्रमुख साधन आहे.
भारतीय रेल्वेतील कोच
भारतीय रेल्वेमध्ये सध्या एकूण 82,200 कोच आहेत, त्यापैकी 57,200 कोच नॉन-एसी आहेत आणि फक्त 25,000 कोच एसी प्रकारात येतात. म्हणजेच सुमारे 70% कोच आजही नॉन-एसी आणि सर्वसामान्यांसाठी आरक्षित आहेत. या आकड्यांवरून हे स्पष्ट होते की, भारतात अजूनही बहुसंख्य प्रवासी हे स्वस्त प्रवासाच्या पर्यायावर विश्वास ठेवतात.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पावसाळी अधिवेशनात या सगळ्या आकड्यांची माहिती सादर केली. त्यांनी या जनरल कोचच्या डब्यांच्या महत्त्वावर आणि त्यांचा भार हलका करण्यासाठी रेल्वे मंत्रालय काय पावले उचलत आहे, यावरही प्रकाश टाकला.