कारगिल युद्ध हे केवळ रणांगणावर लढले गेलेलं युद्ध नव्हतं, तर भारताच्या सामर्थ्याची, जिद्दीची आणि अखंडतेची साक्ष होती. मे 1999 मध्ये जेव्हा पाकिस्तानने कारगिलच्या उंच, बर्फाच्छादित पर्वतरांगांवरून भारतात घुसखोरी केली, तेव्हा भारतासाठी हा क्षण केवळ लष्करी नव्हता, तो स्वाभिमानाचा प्रश्न होता. देशाने आपल्या वीर जवानांच्या धाडसावर आणि ‘ऑपरेशन विजय’च्या यशस्वीतेवर उभे राहून 26 जुलै रोजी कारगिल विजयाचा झेंडा अभिमानाने फडकावला.

पण हा विजय सहज मिळालेला नव्हता. दोन महिन्यांच्या या संघर्षात भारताने मोठी किंमत मोजली. फक्त आर्थिकच नाही, तर माणसांच्या रूपातही. सुमारे 5,000 ते 10,000 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च भारताने युद्धात केला. हवाई दलानेच 300 हून अधिक हल्ले केले, ज्यासाठी जवळपास 2,000 कोटी रुपये खर्च झाले. दररोज सरासरी 10 ते 15 कोटी रुपये जमीन लढाईसाठी लागायचे, तर काही आकडेवारीनुसार एकूण दैनंदिन खर्च 1,460 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता.
भारताला किती खर्च आला?
आर्थिकदृष्ट्या हे अतिशय मोठं आव्हान असलं, तरी भारताची अर्थव्यवस्था तेव्हाही पुरेशी मजबूत होती. देशाकडे तेव्हा 33.5 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा होता आणि 10 अब्ज डॉलर्सचा संरक्षण बजेट उपलब्ध होतं, ज्यामुळे युद्धाचा भार पेलणं शक्य झालं. पण त्याहीपेक्षा मोठा तोटा झाला, तो म्हणजे आपल्या 527 शूर सैनिकांचा. या वीर जवानांनी हिमालयातील कठीण परिस्थितीत, शत्रूला मागे हाकलून भारताचा प्रत्येक इंच सुरक्षित ठेवला. या युद्धात 1,363 हून अधिक सैनिक जखमी झाले.
पाकिस्तानचे किती नुकसान झाले?
दुसरीकडे पाकिस्तानने युद्धात जाहीरपणे केवळ 357 सैनिकांच्या मृत्यूची कबुली दिली. पण स्वतंत्र आणि आंतरराष्ट्रीय सूत्रांनी ही संख्या 3,000 पर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानने अनेक वेळा आपल्या जवानांचे मृतदेहही स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे त्यांच्या लष्करी आणि मानवी मूल्यांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला होता.
या युद्धात पाकिस्तानचा आर्थिक आणि राजनैतिक पराभवही मोठा होता. लाहोर घोषणेनंतर लगेच घडलेल्या या घुसखोरीमुळे त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेला. दररोज सुमारे 370 कोटी रुपयांचा खर्च त्यांना सहन करता आला नाही, आणि त्यांच्या कमजोर अर्थव्यवस्थेमुळे युद्ध लांबवण्याची ताकद त्यांच्याकडे नव्हती.
कारगिल युद्ध भारतासाठी एक मोठा धडा ठरला. या लढाईत काही महत्त्वाच्या कमतरता उघड झाल्या. जसं की नाईट व्हिजन उपकरणं, बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि शत्रू शोधणाऱ्या रडार्सची कमतरता. यानंतर भारताने आपल्या संरक्षण यंत्रणेत मोठ्या सुधारणा केल्या. आज कारगिलसारख्या दुर्गम भागांमध्ये पक्के रस्ते, बोगदे आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतीय लष्कर अधिक सक्षम बनलं आहे.