क्रिकेट हा भारतात केवळ खेळ नाही, तर भावनांचा झंझावात आहे. देशभरातील लाखो तरुणांसाठी क्रिकेट हा स्वप्नांचा मार्ग आहे. पण आंतरराष्ट्रीय टीमपर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या मर्यादित असते, म्हणूनच देशांतर्गत क्रिकेट विशेषतः रणजी ट्रॉफी या स्पर्धेचं महत्त्व अपार आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयकडून चांगली रक्कम दिली जाते आणि ही रक्कम पाकिस्तानसारख्या देशांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे.

रणजी खेळाडूंचा पगार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आपल्या रणजी ट्रॉफीतील वेतन पद्धतीत गेल्या काही वर्षांत मोठा बदल केला आहे. आता खेळाडूंना त्यांच्या अनुभवाच्या आधारावर प्रतिदिन मानधन दिलं जातं. ज्या खेळाडूंनी 40 हून अधिक रणजी सामने खेळले आहेत, त्यांना प्लेइंग-11 मध्ये असताना दररोज 60,000 रुपये मिळतात, तर राखीव खेळाडूंना 30,000 रुपये दिले जातात. याचा अर्थ एका सामन्याच्या चार दिवसांतील एक प्रमुख खेळाडू सरासरी 2,40,000 रुपये कमावतो.
तसंच, ज्या खेळाडूंनी 21 ते 40 रणजी सामने खेळले आहेत, त्यांना दररोज 50,000 रुपये (राखीवांसाठी 25,000 रुपये) दिले जातात. नवोदित खेळाडू, ज्यांनी 20 किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळले आहेत, त्यांनाही दररोज 40,000 रुपये (राखीवांसाठी 20,000 रुपये) इतकं वेतन दिलं जातं. म्हणजेच, अनुभवाच्या टप्प्यानुसार वेतनही बदलतं.
पाकिस्तानी खेळाडूंचा पगार
दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी मात्र अजूनही देशांतर्गत क्रिकेटपटूंना फार कमी रक्कम देते. अलिकडेच त्यांनी सामना शुल्क वाढवून प्रमुख खेळाडूंना 40,000 पाकिस्तानी रुपये आणि राखीव खेळाडूंना 20,000 रुपये इतके मानधन देण्याची घोषणा केली आहे. भारतीय रुपयात पाहिल्यास ही रक्कम अनुक्रमे सुमारे ₹12,000 आणि ₹6,000 इतकी होते. त्यामुळे भारतातील रणजी खेळाडू पाकिस्तानच्या तुलनेत सुमारे 3 ते 5 पट अधिक पगार घेतात.
ही वेतनरचना केवळ आर्थिक सक्षमीकरणासाठीच नाही, तर भारतीय देशांतर्गत क्रिकेटचे भविष्य मजबूत करण्यासाठीही महत्त्वाची ठरते. बीसीसीआयचा हा दृष्टिकोन क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवू पाहणाऱ्या नवोदितांसाठी एक मोठी प्रेरणा ठरतो.