सोने केवळ दागिन्यांचा भाग नसून, जगाच्या अर्थव्यवस्थेत त्याचे एक वेगळेच स्थान आहे. हजारो वर्षांपासून संपत्तीचे प्रतीक मानला जाणारा हा मौल्यवान धातू आजही जगभरातील देशांच्या आर्थिक बळकटीचे द्योतक मानला जातो. जागतिक तणाव, युद्धजन्य परिस्थिती किंवा चलनाची घसरण अशा कुठल्याही संकटाच्या काळात सोने हे सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. त्यामुळे जगभरातील अनेक देश आपापले सोन्याचे साठे वाढवण्यात व्यग्र आहेत.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या आकडेवारीनुसार, सर्वात जास्त सोने साठवणारा देश आहे अमेरिका. आश्चर्याची बाब म्हणजे भारतही या यादीतील टॉप-10 देशांमध्ये सामील आहे. पण भारताचा क्रमांक काय आहे, हे समजल्यावर अनेकजण थक्क होतील.

अमेरिका टॉपवर
जगातील सर्वाधिक सोने अमेरिकेकडे आहे तब्बल 8,133.46 टन. या साठ्याची किंमत जवळपास $682 अब्जांहून अधिक आहे. इतकं प्रचंड सोनं केवळ आर्थिक बळकटीचं नव्हे, तर अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाचंही प्रतीक मानलं जातं. हे सोने फोर्ट नॉक्स आणि इतर सरकारी भांडारगृहांमध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे.
जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर
दुसऱ्या क्रमांकावर आहे युरोपमधील बलाढ्य देश जर्मनी, ज्याच्याकडे आहे 3,351 टन सोने. जर्मनीने विशेषतः 20व्या शतकातला आर्थिक अस्थिरतेचा अनुभव घेतल्यानंतर, सोन्यात गुंतवणूक वाढवली आणि आजही हे देश त्याला अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याचं आधार मानतो.
इटली आणि फ्रान्स
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे इटली आणि फ्रान्स आहेत, ज्यांच्याकडे सुमारे 2,450 टनांपेक्षा अधिक सोने आहे. युरोपमधील हे देश ऐतिहासिकदृष्ट्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतीक राहिले आहेत आणि त्यांची ही भक्कम सोने-निती अजूनही टिकून आहे.
चीन
आशियात पाहिलं तर चीन हा पाचव्या स्थानावर आहे. त्याच्याकडे 2,279.56 टन सोन्याचा साठा आहे, आणि चीन ही मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करणारी आणि साठवणारी जागतिक आर्थिक महासत्ता बनली आहे. यामुळे चीनची जागतिक गुंतवणूक बाजारपेठेतील भूमिका आणखी प्रभावी झाली आहे.
भारत कितव्या नंबरवर?
आता सर्वांच्या नजरा ज्या देशाकडे वळतात, तो म्हणजे भारत. देशातील प्रत्येक घराघरांत सोनं आहे, लग्नसमारंभांमध्ये सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात बनवले जातात आणि महिलांमध्ये सोन्याबद्दल विशेष आकर्षण आहे. पण तरीही, भारताचे स्थान यादीत आठव्या क्रमांकावर येते.
भारताकडे सध्या 876.18 टन सोने आहे, ज्याची सध्याच्या किंमतीनुसार बाजारमूल्य सुमारे ₹6 लाख कोटींहून अधिक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडील हा साठा देशाच्या आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, पण तरीही भारत ‘सोन्याचा देश’ असूनही पहिल्या तीन किंवा पाच क्रमांकांत नाही, याची अनेकांना खंत वाटेल.
भारताच्या खालोखाल जपान (846 टन), नेदरलँड्स (612 टन) आणि पोलंड (377 टन) यांचा नंबर लागतो. हे सर्व देश आर्थिकदृष्ट्या सजग असून, त्यांच्या सोने खरेदी धोरणात शिस्त आणि धोरणात्मकता दिसून येते.