भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने विरोधी संघांना हादरवणारा मोहम्मद सिराज आज केवळ खेळाडू नाही, तर एक सन्मानित सरकारी अधिकारी आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर, तेलंगणा सरकारने त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्याला एक विशेष सन्मान बहाल केला डीएसपी पदवीचा.

टीम इंडियाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सिराज घरी परतल्यानंतर त्याचा मोठा सन्मान केला. त्यांनी सिराजला सरकारी नोकरी, रोख बक्षीस आणि 600 चौरस यार्डचा भूखंड देण्याचं वचन दिलं आणि विशेष म्हणजे, हे वचन केवळ भाषणापुरतं मर्यादित न ठेवता, प्रत्यक्षातही पूर्ण केलं. सिराज आता तेलंगणा पोलिस विभागात पोलिस उपअधीक्षक (DSP) म्हणून नियुक्त झाला आहे.
मोहम्मद सिराजचा पगार
अनेकांच्या मनात एक उत्सुकता असते की, अशा एका क्रीडा कोट्यातून निवड झालेल्या डीएसपी अधिकाऱ्याला नेमका किती पगार मिळतो? काही मीडिया रिपोर्टनुसार, तेलंगणा पोलिसांमध्ये डीएसपी या पदासाठी वेतनश्रेणी ₹58,850 ते ₹1,37,050 दरम्यान असते. म्हणजेच, पगाराच्या बाबतीतही हा एक प्रतिष्ठेचा आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत पद आहे. एवढंच नव्हे तर, या पदासोबत घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, प्रवास भत्ता अशा अनेक सुविधा देखील मिळतात, ज्या इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या जातात.
सिराजला ही नोकरी क्रीडा कोट्याअंतर्गत मिळाली आहे, म्हणजेच केवळ शैक्षणिक पात्रतेवर नव्हे तर त्याच्या खेळातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यशस्वी योगदानाच्या जोरावर. हा निर्णय अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. तो केवळ सिराजसाठी नाही, तर प्रत्येक खेळाडूसाठी एक सकारात्मक संदेश आहे की मेहनतीला आणि देशसेवेला सरकारकडून योग्य मान दिला जातो.
सिराजची पार्श्वभूमी
या सन्मानासोबतच, सिराजला मिळालेला 600 चौरस यार्ड भूखंड आणि रोख बक्षीस रक्कम ही केवळ भेटवस्तू नाहीत, तर त्याच्या संघर्षाच्या आणि देशासाठी केलेल्या योगदानाच्या मान्यतेची खूण आहेत.
एक सामान्य कुटुंबातून आलेला मोहम्मद सिराज, ज्याच्या वडिलांनी एक रिक्षाचालक म्हणून घर चालवलं आज देशासाठी खेळतो, आणि आता कायदा आणि सुरक्षा यंत्रणेतही मानाचं स्थान प्राप्त करतोय, तो आज अनेकांसाठी प्रेरणा बनला आहे.