स्वयंपाकघरात काम करताना भांडी, अन्नपदार्थ किंवा इतर वस्तू पडणे ही सामान्य गोष्ट वाटू शकते, ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. जसं की, दूध उकळून बाहेर सांडणं, मीठ चुकून टाकणं किंवा तेल हातातून घसरून खाली पडणं. हे सगळं बघताना वाटतं की, ‘अरे, चुकूनच घडलं असेल’. पण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे संकेत काहीतरी सांगत असतात. असे काहीतरी जे पुढे घडणार असतं, आणि आपण त्याची चाहूलही घेत नाही.

सतत दूध सांडणे
वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक कृती, हालचाल, वस्तूंचं ठेवणं या सगळ्याला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. विशेषतः स्वयंपाकघरात जर वारंवार विशिष्ट गोष्टी पडत असतील, तर ते घरातील उर्जेच्या असंतुलनाचं लक्षण असू शकतं. उदा. जर तुम्ही सतत दूध उकळताना ते सांडवत असाल, तर हे केवळ गाफीलपणाचं नाही. दूध हे चंद्र आणि शुक्र यांचं प्रतीक मानलं जातं, आणि सतत सांडणारं दूध हे घरातील शांतता ढवळून काढू शकतं. मानसिक अस्वस्थता, भावनिक असमतोल, नकारात्मक विचार यांची सुरूवात इथूनच होत असते.
मीठ सतत पडणं
तसंच मीठ सतत पडणं हेही सहज घडलेली चूक वाटते. पण वास्तुशास्त्रात मीठाचं आपलं एक वेगळं स्थान आहे. मीठ हे पांढरं असल्याने त्याचा संबंधही चंद्राशी जोडला जातो. जर घरातलं मीठ वारंवार खाली पडत असेल, तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की, घरातील वातावरण तणावपूर्ण होण्याच्या वाटेवर आहे. कुटुंबातल्या नात्यांमध्ये दुरावा येतो, संवाद तुटतो आणि अगदी किरकोळ कारणांवरून मतभेद वाढतात.
मोहरीचं तेल
मोहरीचं तेल हे तर स्वयंपाकघरातील एक सर्वसामान्य घटक आहे. पण जर तेच तेल सतत हातातून घसरून खाली पडत असेल, तर त्यामागे वास्तुशास्त्र एक गंभीर इशारा देतं. मोहरीचं तेल शनी ग्रहाशी संबंधित मानलं जातं, आणि शनीचा अशुभ प्रभाव आयुष्यात अडथळे, अपघात किंवा अपयश घेऊन येऊ शकतो. अशा वेळेस आपण एक क्षण थांबून विचार करणं गरजेचं ठरतं. केवळ किचनमध्येच नव्हे, तर जीवनातल्या इतर बाबतीतही आपण कुठे कमी पडतोय का?
हळद
पण या सगळ्यात एक सुखद बाब म्हणजे हळद. स्वयंपाक करताना जर हळद चुकून खाली पडली, तर त्याकडे संकटाच्या इशाऱ्याऐवजी एका शुभ सुरुवातीच्या दृष्टीने पाहिलं जातं. हळद ही शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक आहे. तिचं पडणं म्हणजे घरात एखादी चांगली बातमी येण्याची चाहूल. विशेषतः कुटुंबात बाळंतपण किंवा सुसंवाद यांचं आगमन होण्याचे संकेतही मानले जातात.