जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जर हिपॅटायटीसविरोधात वेळीच ठोस आणि सातत्यपूर्ण उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर 2030 पर्यंत जवळपास 95 लाख नवीन संसर्ग, यकृताच्या कर्करोगाचे 21 लाख रुग्ण आणि एकट्या संसर्गजन्य हिपॅटायटीसमुळे 28 लाख मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ही बाब केवळ वैद्यकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही गंभीर ठरते.

दरवर्षी जुलै महिन्यात जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. हिपॅटायटीस बी विषाणूचा शोध लावणारे डॉ. बारुच एस. ब्लमबर्ग यांच्या सन्मानार्थ हा दिवस निवडण्यात आला. त्यांनी 1976 मध्ये यासाठी नोबेल पारितोषिक पटकावले होते. हा दिवस म्हणजे फक्त जनजागृतीचा नव्हे, तर कृतीचा निर्धार करण्याचा दिवस आहे.
हिपॅटायटीस म्हणजे काय?
हिपॅटायटीस म्हणजे यकृतात होणारी सूज किंवा जळजळ, जी बहुधा विषाणूंमुळे होते. हिपॅटायटीसचे प्रकार A, B, C, D आणि E आहेत. हे विषाणू दूषित अन्न, पाणी, रक्त, किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्काने पसरतात. काही वेळा अत्यधिक मद्यपान, विशिष्ट औषधांचे परिणाम किंवा शरीरातील यंत्रणेतील बिघाडामुळेही हिपॅटायटीस होऊ शकतो.
हिपॅटायटीसची लक्षणे
हिपॅटायटीसची सुरुवात अगदी सौम्य लक्षणांनी होते. ताप, थकवा, भूक न लागणे, उलटी, गडद रंगाची लघवी, कावीळ पण ही लक्षणे दुर्लक्षित केल्यास हिपॅटायटीस B, C आणि D दीर्घकालीन स्वरूप धारण करून यकृत निकामी करण्याइतका धोका निर्माण करतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणं अत्यंत आवश्यक आहे.
उपचार पद्धती
हिपॅटायटीस A आणि B साठी प्रभावी लस उपलब्ध आहे. विशेषतः नवजात बालकासाठी जन्माच्या पहिल्या 24 तासांत हिपॅटायटीस B ची लस घेणं अत्यावश्यक मानलं जातं. हिपॅटायटीस B आणि C साठी अँटीव्हायरल औषधांचा वापर केला जातो, ज्यामुळे रोगाचं दीर्घकालीन स्वरूप टाळता येतं आणि यकृताचे नुकसान रोखता येतं. पण यासाठी चाचण्या वेळेवर होणं आणि उपचार त्वरित सुरू होणं गरजेचं आहे.