भारतीय क्रिकेटचा आत्मा मानले जाणारे रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या त्यांच्या कारकिर्दीच्या अत्यंत संवेदनशील वळणावर उभे आहेत. गेल्या काही महिन्यांत त्यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून एक पर्व संपवलं. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घर करून बसला आहे आता हे दोघं एकदिवसीय क्रिकेटमधूनही लवकरच निरोप घेणार का?

बीसीसीआयने केला खुलासा
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेसाठी आहे आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीही याच ठिकाणी उपस्थित आहेत. अशाच एका कार्यक्रमात उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या दोघांच्या भविष्यावर थेट भाष्य करत स्पष्टता आणली. त्यांनी सांगितलं की रोहित आणि विराट दोघेही अजूनही एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे उपलब्ध आहेत. आणि या बातमीने त्यांचे करोडो चाहते काही काळ तरी नक्कीच सुटकेचा निःश्वास टाकतील.
विशेष म्हणजे, विराट कोहलीने अगदी अलीकडेच जाहीरपणे 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार असून ती त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मोठी स्पर्धा ठरू शकते. रोहित शर्माने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना स्पष्ट केले होते की तो अद्याप एकदिवसीय सामन्यांसाठी उत्सुक आहे. त्यामुळे या दोघांनीही अजून काही वर्षे भारतीय संघासाठी आपले योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे.
रोहित आणि विराट निवृत्ती घेणार?
राजीव शुक्ला यांनी यावेळी बीसीसीआयच्या धोरणावरही प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही खेळाडूला कधी निवृत्ती घ्यायची हे सांगणं बीसीसीआयचं काम नाही. हा निर्णय पूर्णतः त्या खेळाडूचा वैयक्तिक असतो. रोहित आणि विराट यांचा कसोटी क्रिकेटमधील निरोपसुद्धा त्यांच्या स्वतःच्या इच्छेने घेतलेला होता.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट निश्चित आहे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये या दोघांची उपस्थिती भारतीय क्रिकेटसाठी अजूनही अनमोल आहे. त्यांच्या अनुभवाने, संयमाने आणि फलंदाजीतील प्रभावीतेने आगामी वर्षांमध्येही भारतीय संघाला मोठं बळ मिळू शकतं.