जगातील जवळजवळ प्रत्येक देशाचा स्वतःचा राष्ट्रीय प्राणी असतो, जो त्या देशाच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक मानला जातो. जसे भारतासाठी वाघ किंवा अमेरिकेसाठी गरुड. पण कल्पना करा, जर एखादा देश आपल्या राष्ट्रीय प्राण्यालाच रोजच्या जेवणात वापरत असेल? ही गोष्ट कुठे तरी असंभव वाटेल, पण सौदी अरेबियामध्ये हीच बाब खरी ठरते. उंट जो या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, त्याचं मांस लोक आनंदाने खातात आणि ही गोष्ट त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे.

सौदी अरेबिया आणि उंट
सौदी अरेबियाचा राष्ट्रीय प्राणी उंट केवळ वाळवंटात टिकून राहण्याची क्षमता असलेला प्राणी नसून, तो शतकानुशतके सौदी लोकांच्या जीवनात वाहतुकीपासून अन्न व दूध उत्पादनापर्यंत अनेक बाबतीत उपयोगी ठरला आहे. उंटांचे दूध पौष्टिक समजले जाते आणि उंटाच्या मांसालाही स्थानिक आहारात मोठं महत्त्व आहे. उंटाच्या मांसाला येथील पारंपरिक जेवणात मोठी मागणी आहे आणि ते विविध प्रकारच्या पाककृतींमध्ये वापरले जाते.
आश्चर्याची बाब म्हणजे सौदी अरेबिया उंट केवळ देशांतर्गत उगम असलेल्या उंटांपुरतेच मर्यादित नाही, तर ते मोठ्या प्रमाणावर उंट ऑस्ट्रेलियामधून आयात करतात. ऑस्ट्रेलियामध्ये उंटांची संख्या प्रचंड आहे आणि तिथले उंट दर्जेदार मानले जातात. इतकंच नव्हे तर पाणीटंचाईमुळे एका वेळी ऑस्ट्रेलियन सरकारने 10,000 उंट मारण्याचे आदेश दिले होते, कारण त्यांची संख्या नियंत्रणाबाहेर जात होती.
सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा भाग
सौदी अरेबियामध्ये उंटांचा उपयोग केवळ अन्नासाठीच केला जात नाही. येथे उंटशर्यती मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात. या शर्यती मनोरंजनाचा एक भाग असून त्यामध्ये प्रचंड रक्कम गुंतवली जाते. त्यामुळे उंट हा सौदी संस्कृतीचा केंद्रबिंदू बनला आहे.
ही माहिती ऐकून अनेक भारतीयांना धक्का बसू शकतो, कारण आपल्याकडे राष्ट्रीय प्राणी हा गौरवाचा विषय असतो. पण सौदी अरेबियात उंट हे केवळ राष्ट्रीय प्रतीक नाही, तर त्यांच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा एक भाग आहे आणि म्हणूनच ते त्यांच्या आहारातही दिसून येते.