भारताच्या हवाई सीमेला अभेद्य बनवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) एक भव्य आणि अत्याधुनिक प्रकल्प राबवत आहे, ज्याचे नाव आहे ‘प्रकल्प कुशा’. या प्रकल्पाद्वारे DRDO जगातील सर्वात घातक हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक निर्माण करत आहे, जी शत्रूच्या क्षेपणास्त्रांना 400 किलोमीटर अंतरावरच पाडून टाकू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, रशिया आणि इस्रायलच्या प्रणालींशी टक्कर देणारी ही भारताची स्वदेशी प्रणाली असेल.

इस्रायल-इराण संघर्ष असो किंवा भारत-पाकिस्तानमधील तणाव अशा संघर्षांमधून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे भविष्याची युद्धं आकाशातून लढली जातील. ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रं, हवाई वाहने यांचा मुकाबला करण्यासाठी भारताला भक्कम हवाई संरक्षण कवच हवेच आहे. हे ओळखून DRDO ने ‘कुशा’ प्रकल्प हाती घेतला आहे, जो भारतीय लष्कराच्या हवाई क्षमतेत क्रांती घडवून आणेल.
तीन पातळ्यांचे संरक्षण कवच
प्रकल्प कुशाच्या अंतर्गत तीन भिन्न प्रकारच्या प्रणाली विकसित केल्या जात आहेत. त्यापैकी एक असलेली
कुशा एम1 ही एक कमी पल्ल्याची प्रणाली, जी जुन्या L70 आणि ZU-23-2B तोफांच्या जागी नव्या शस्त्रांद्वारे आधुनिक हवाई संरक्षण पुरवेल.
यानंतर असणारी कुशा एम2 ही मध्यम पल्ल्याची प्रणाली असून ती विद्यमान पेचोरा क्षेपणास्त्रांऐवजी वापरली जाईल. तर, कुशा एम3 ही सर्वात महत्त्वाची, दीर्घ पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली असणार आहे.ही प्रणाली 400 किमीपर्यंतच्या हवाई धोक्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करू शकते. ही प्रणाली रशियन S-400, स्वदेशी आकाश आणि इस्रायली बाराक-8 यांच्या बरोबरीची किंवा अधिक प्रभावी असेल.
2030 पर्यंत भारतीय लष्करात
या प्रकल्पातील चाचण्या पुढील तीन ते चार वर्षांत सुरू होतील. कुशा एम1 ची चाचणी 2025 मध्ये अपेक्षित असून ती 2028 पर्यंत सैन्यात सामील केली जाईल. कुशा एम2 ची चाचणी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तर 400 किमी पल्ल्याची कुशा एम3 प्रणाली 2027 मध्ये चाचणीसाठी सज्ज होईल आणि 2030 पर्यंत लष्करात पूर्ण समावेश होईल.
या सर्व प्रणाली 90% पेक्षा अधिक स्वदेशी उपकरणांवर आधारित आहेत. म्हणजेच, भारत आपल्या संरक्षण यंत्रणेमध्ये केवळ परावलंबी राहणार नाही, तर स्वतःची अभेद्य ढाल निर्माण करणार आहे. प्रकल्प कुशा हे भारताच्या स्वावलंबी संरक्षण क्षेत्राचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. शत्रूच्या हल्ल्याचा आधीच बंदोबस्त करणारी ही प्रणाली भारताच्या हवाई सीमेला अभेद्य बनवेल.