भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना… या चार शब्दांतच एक वेगळीच भावना दडलेली असते. कधी उत्साह तर कधी प्रचंड राग. आशिया खंडातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना नेहमीच काळजाचा ठोका चुकवणारा असतो. अशा पार्श्वभूमीवर आशिया कप 2025 चं वेळापत्रक जाहीर झालं आणि पुन्हा एकदा या चिरपरिचित प्रतिस्पर्ध्यांची टक्कर ठरली. मात्र यंदा या सामन्याच्या पार्श्वभूमीवर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचं सावट गडद आहे, आणि त्यामुळेच या सामन्याचं राजकारण आणि भावनिक वलय अधिकच वाढलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत प्रचंड ताणले गेले आहेत. 2012 पासून दोन्ही देशांमध्ये कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. एकमेकांशी खेळण्याची संधी केवळ आयसीसी किंवा आशियाई स्पर्धांपुरती मर्यादित राहिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने ही दरी अजून वाढवली. भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानविरुद्ध सर्व प्रकारचे संबंध खंडित केले. सिंधू नदीचे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला आणि दहशतवादी अड्ड्यांवर थेट कारवाई केली. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळावं का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आशिया कप 2025 चे वेळापत्रक
आशिया कप यंदा 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होईल. या सामन्याची अधिकृत घोषणा होताच, सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. अनेक जणांचा ठाम विश्वास आहे की, पहलगामच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचा सामना टाळावा.
सौरव गांगुलीचे मत
पण या सगळ्या भावना आणि राजकारणाच्या भोवऱ्यात माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचं मत वेगळ्या मार्गाने जातं. ‘दादा’ने नेहमीप्रमाणे स्पष्ट भूमिका घेत खेळ सुरू ठेवण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, भारत आणि पाकिस्तान यांच्या गटातील सामना नियोजित आहे आणि यात त्यांना काही अडचण वाटत नाही. गांगुली म्हणतात, “दहशतवाद संपणं अत्यंत गरजेचं आहे. पहलगामसारखी घटना पुन्हा घडू नये. पण त्यामुळे आपण खेळ थांबवू नये. क्रिकेट सुरू राहायला हवं.”
या स्पर्धेत भारत-पाकिस्तान किमान दोन ते तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात. 10 सप्टेंबर रोजी भारत युएईविरुद्ध आपली मोहीम सुरू करेल, आणि सुपर फोर टप्प्यात 21 सप्टेंबरला पुन्हा पाकिस्तानशी भिडण्याची शक्यता आहे.