इंग्लंडचा बेन स्टोक्स सध्या भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेत इंग्लंडचा हा आक्रमक कर्णधार केवळ नेतृत्व करत नाही, तर मैदानावर स्वतःच्या कामगिरीनंही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

यावेळी त्याची बॅट नाही, तर चेंडू बोलतो आहे आणि तोही अशा ताकदीनं की भारतीय फलंदाजांची झोप उडाली आहे. स्टोक्सने या मालिकेत पाच मोठे ऐतिहासिक विक्रम रचले आहेत, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील टप्पेच नव्हे, तर इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातही नोंदवले जातील.
129 षटके
या मालिकेत स्टोक्सने सर्वाधिक षटके टाकत स्वतःचा वैयक्तिक विक्रम मोडला आहे. तब्बल 129 षटके टाकून त्याने सिद्ध केलं की तो फक्त एक फलंदाज किंवा कर्णधार नाही, तर गरज पडली की आघाडीचा वेगवान गोलंदाजही बनू शकतो. आणि ही कामगिरी अशा वेळी केली आहे, जेव्हा इंग्लंडला विकेट्स मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता.
16 बळी
त्याचबरोबर स्टोक्सने या मालिकेत आतापर्यंत एकूण 16 बळी घेतले आहेत, जे एका कसोटी मालिकेत त्याचे सर्वाधिक बळी आहेत. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये तो सध्या सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या प्रत्येक स्पेलमध्ये एक प्रकारची जबाबदारी दिसते संघाला पुढे नेण्याची.
कर्णधार म्हणून 5 बळी
या यशाचं आणखी एक विशेष स्थान म्हणजे, कर्णधार म्हणून पहिल्यांदाच स्टोक्सने एका डावात 5 विकेट्स घेतल्या. मँचेस्टर कसोटीत त्याने 62 धावांत 5 बळी टिपले. या यादीत साई सुदर्शन आणि शुभमन गिलसारख्या भारतीय युवा खेळाडूंच्या विकेटचाही समावेश होता.
घरच्या मैदानावर 50 बळी
घरी खेळताना दबाव जास्त असतो असं म्हटलं जातं, पण स्टोक्सने या घरच्या वातावरणातही विक्रम घडवले. तो इंग्लंडच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे ज्याने घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 50 बळी घेतले आहेत. यापूर्वी अनेक दिग्गज इंग्लिश कर्णधार आले, पण कोणालाही हे साधता आलं नव्हतं.
10 पेक्षा अधिक शतके
शेवटी, बेन स्टोक्सने एक वेगळा मैलाचा दगडही गाठला.कसोटी क्रिकेटमध्ये 10 पेक्षा अधिक शतके आणि 5 वेळा पाच बळी घेणारा तो फक्त चौथा खेळाडू आहे. म्हणजेच, तो फक्त एक ऑलराऊंडर नाही तो त्या अत्यंत कमी खेळाडूंपैकी एक आहे, जे दोन्ही विभागांत खेळाची दिशा बदलण्याची ताकद बाळगतात.