भारताच्या नौदलाला 18 जुलै 2025 रोजी एक ऐतिहासिक बळकटी मिळाली आहे. विशाखापट्टणमच्या नौदल डॉकयार्डमध्ये स्वदेशी बनावटीचे पहिले डायव्हिंग सपोर्ट व्हेसल ‘निस्तार’ अधिकृतरीत्या नौदलात सामील झाले आहे. हे जहाज भारताच्या नौदलासाठी एक गेम-चेंजर ठरणार आहे, जे समुद्रात सखोल ऑपरेशन्स, पाणबुडी बचाव आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी जबरदस्त उपयोगी आहे.

‘निस्तार’
‘निस्तार’ हे डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसल (DSRV) साठी ‘मदर शिप’ म्हणून काम करणार आहे. म्हणजेच, पाणबुडी अडकली तर त्या आत अडकलेल्या नौसैनिकांना वाचवण्यासाठी हे जहाज मदतीला धावेल. त्यासाठी यात अत्याधुनिक डायव्हिंग सिस्टम आणि 1000 मीटर खोल समुद्रात काम करणारे रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल (ROV) बसवले आहेत. यामुळे अंधारात गडप झालेल्या वस्तूंवर देखील हे जहाज लक्ष ठेवू शकते.
हे जहाज संपूर्णपणे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने भारतातच बनवले असून हे आत्मनिर्भर भारत मोहिमेचा उत्तम नमुना आहे. ‘निस्तार’चे वजन सुमारे 10,000 टन असून ते 118 मीटर लांब आहे. याची रचना एवढी प्रगत आहे की ते 60 दिवसांहून अधिक काळ सतत समुद्रात ऑपरेशन करू शकते. शिवाय, यामध्ये हेलिकॉप्टर उतरण्याची सुविधाही आहे आणि 15 टनची पाण्याखालील क्रेनही बसवण्यात आली आहे.
निस्तारची खासियत
निस्तार सुमारे 300 मीटर खोलीपर्यंत सॅच्युरेशन डायव्हिंग करण्यास सक्षम आहे. यामध्ये साइड डायव्हिंग स्टेजदेखील आहे, जी 75 मीटर पर्यंतची खोलाई सहजतेने पार करू शकते.
अलीकडच्या काळात हिंद महासागरात चिनी गुप्तचर पाणबुड्या दिसत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निस्तारसारखे जहाज भारतीय नौदलाच्या गस्ती मोहिमांमध्ये मोठी मदत करेल. विशेषतः चिनी किंवा पाकिस्तानी पाणबुड्यांच्या हालचाली टिपण्यासाठी हे जहाज निर्णायक ठरू शकते.
‘निस्तार’चा अर्थ
‘निस्तार’ या संस्कृत नावाचा अर्थ आहे ‘मुक्ती’ किंवा ‘मोक्ष’. आणि खरंच, हे जहाज पाण्याखाली अडकलेल्या नौसैनिकांसाठी मोक्षदायक ठरणार आहे. यामुळे भारताची अण्वस्त्र पाणबुडी आणि खोल समुद्रातल्या ऑपरेशन्समधील क्षमता अधिक मजबूत झाली आहे.
पाकिस्तानसारख्या शेजारी देशांसाठी हे जहाज एक धोक्याची घंटा ठरू शकते कारण आता भारत केवळ जमिनीवर नव्हे, तर खोल समुद्रातही प्रचंड ताकदीने सज्ज झाला आहे.