महिला क्रिकेट पूर्वी केवळ काही मर्यादित देशांतच गंभीरतेने घेतलं जायचं, मात्र गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटला मिळालेलं व्यावसायिक रूप आणि विविध लीग्समुळे या खेळाने आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठा जम बसवला आहे. त्यामुळे महिला खेळाडूंना आता केवळ देशासाठी नव्हे तर अनेक लीग्स, ब्रँड अँबेसडरशिप, जाहिराती यांमधून भरघोस कमाई करता येते. आज आपण अशा टॉप 5 महिला क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जगातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडू ठरल्या आहेत.
एलिस पेरी

ऑस्ट्रेलियाची सुपरस्टार ऑलराउंडर एलिस पेरी ही यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. क्रिकेटसोबतच पेरीने फुटबॉलमध्येही ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. सध्या ती WPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळते. तिची एकूण संपत्ती सुमारे $14 मिलियन म्हणजेच 115 कोटी रुपयांच्या घरात आहे.
मेग लॅनिंग
दुसऱ्या स्थानावर आहे मेग लॅनिंग, जी ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. तिच्या नावावर 8,000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा असून तिची एकूण संपत्ती 74 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. तिचं करिअर व कमाई या दोन्ही बाबतीत लॅनिंग आघाडीवर आहे.
मिताली राज
भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज ही यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवणाऱ्या मिताली राजची एकूण संपत्ती $5 मिलियन म्हणजे सुमारे 41 कोटी रुपये आहे. निवृत्तीनंतरही मिताली विविध ब्रँड्ससाठी काम करते आणि महिला क्रिकेटचं प्रतीक मानली जाते.
स्मृती मानधना
भारतीय सलामीवीर स्मृती मानधना ही यादीत चौथ्या स्थानी आहे. डावखोरी फलंदाज स्मृतीची शैली आणि लोकप्रियता दोन्हीच जबरदस्त आहेत. सध्या ती भारतासाठी आणि RCB कडून WPL मध्ये खेळते. तिची एकूण संपत्ती $4 मिलियन म्हणजेच सुमारे 33 कोटी रुपये आहे.
हरमनप्रीत कौर
सध्याची भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही पाचव्या स्थानावर आहे. आक्रमक फलंदाजी आणि आंतरराष्ट्रीय अनुभव यामुळे हरमनप्रीतला ब्रँड डील्स आणि WPL मधूनही चांगली कमाई होते. तिची एकूण संपत्ती $3 मिलियन म्हणजेच सुमारे 25 कोटी रुपये आहे.