भारताची लॉटरी! राजस्थानच्या वाळवंटात सापडला 17 दुर्मिळ खनिजांचा खजिना, पाहा भारताला काय फायदा होणार?

Published on -

राजस्थानच्या तप्त वाळवंटात नुकताच असा खजिना सापडला आहे, जो भारताच्या भविष्यासाठी ‘गोल्डमाईन’ ठरू शकतो तो म्हणजे दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा (Rare Earth Elements) साठा. अनेक वर्षांपासून चीन या खनिजांवर जागतिक मक्तेदारी गाजवत होता. पण आता भारतातही असे साठे सापडू लागलेत, ज्यामुळे ही मक्तेदारी डळमळीत होण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या संस्थांनी राजस्थानातील जमीनींमध्ये 17 दुर्मिळ खनिजांची उपस्थिती असल्याचे स्पष्ट केले असून, लवकरच त्यांचा लिलाव करून उत्खनन सुरू केले जाणार आहे.

‘ही’ खनिजे सापडली

बालोत्रा आणि जालोर या राजस्थानमधील भागांमध्ये हे महत्त्वाचे साठे आहेत, जे भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) आणि अणुऊर्जा विभागाच्या संशोधनातून समोर आले. या ठिकाणी बॅस्टनासाइट, ब्रिथोलाइट आणि झेनोटाइम या मूळ खनिजांचे मोठे प्रमाण सापडले आहे, ज्यामधून सेरियम, लॅन्थॅनम, निओडायमियम, डिस्प्रोसियम, गॅडोलिनियम यांसारखी दुर्मिळ पृथ्वी खनिजे काढली जातात. ही खनिजे तांत्रिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ऑटोमोबाइल्स, हरित ऊर्जा उपकरणे, लढाऊ विमाने, मिसाईल्स आणि सोलर पॅनेल्स यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक दुर्मिळ पृथ्वी खनिज साठे आहेत. मात्र अजूनतरी भारत या साठ्यांचा पुरेपूर उपयोग करत नव्हता. त्यामुळेच चीनवर आयातीसाठी अवलंबून राहावे लागत होते. पण आता सरकारने 1,000 कोटी रुपयांची PLI (Production Linked Incentive) योजना जाहीर केली असून, त्याअंतर्गत देशांतर्गत उत्पादनाला चालना दिली जाणार आहे.

भारताची खनिज संपत्ती

दुर्मिळ पृथ्वी खनिजांची ‘दुर्मिळता’ त्याच्या उत्पादन प्रक्रियेमुळे आहे. ही खनिजे वेगवेगळ्या खडकांमध्ये मिसळलेली असतात आणि त्यांचे शुद्धीकरण एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. भारतात सापडणाऱ्या काही साठ्यांमध्ये धातूंचे प्रमाण खूप कमी असल्याने त्याचा व्यावसायिक वापर फारसा शक्य नव्हता. मात्र, राजस्थानमध्ये सापडलेल्या या साठ्यांमुळे ही समस्या कमी होईल अशी आशा आहे, कारण हे साठे कठीण खडकांमध्ये असून त्यामधील धातूंचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याचे आढळून आले आहे.

या साऱ्या घडामोडींमुळे भारत केवळ दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार नाही, तर जागतिक बाजारात एक मजबूत पर्याय म्हणून उदयास येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!