13 तारखेला जन्म खरंच अशुभ मानला जातो का?, राहूच्या अधिपत्याखाली जन्मलेल्या या लोकांचं भविष्य कसं असतं?

काही संख्यांना आपण फक्त आकडे समजतो, तर काही संख्यांना समाजात विशेष अर्थ दिला जातो. त्यातलीच एक संख्या म्हणजे 13. ही एक अशी तारीख आहे, जिच्याशी अनेक समज-गैरसमज, भीती आणि गूढता जोडलेली आहे. विशेषतः जर एखाद्याचा जन्मच 13 तारखेला झाला असेल, तर बऱ्याचदा त्याच्याकडे “अशुभ” या नजरेने पाहिले जाते. पण खरंच 13 तारखेचा जन्म म्हणजे अशुभ आहे का? की ही एक ताकदवान संधी असू शकते? याचा विचार आपण अंकशास्त्र आणि ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून करूया.

भारतीय अंकशास्त्र

भारतीय अंकशास्त्रात 13 ही संख्या 1 आणि 3 यांची बेरीज असलेल्या 4 या मूलांकाशी जोडली जाते. हा अंक राहू या ग्रहाचे प्रतीक मानला जातो, जो सामान्यतः भ्रम, संघर्ष आणि बदलाचे संकेत देतो. मात्र, हे लक्षात घ्या की राहू केवळ अडथळ्यांचं प्रतिनिधित्व करत नाही, तर तो व्यक्तीला अनपेक्षित यश, नाविन्यपूर्ण विचार आणि वेगळेपणाचं वरदान देखील देतो. त्यामुळे 13 तारखेचा जन्म म्हणजे एक असामान्य आणि गूढ प्रवासाची सुरुवात.

पाश्चात्य संस्कृतीतील 13 अंकाचे महत्व

पाश्चात्य संस्कृतीत 13 या संख्येची भीती इतकी खोलवर आहे की काही इमारतींमध्ये 13 वा मजला नसतो, काही लोक शुक्रवार तसेच 13 तारखेला महत्त्वाचे निर्णय घेण्यास टाळतात. पण भारतीय दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. येथे 13 अंकाला थेट घातक मानण्याऐवजी त्यामागे असलेल्या ग्रहांच्या प्रभावाकडे लक्ष दिलं जातं.

13 तारखेला जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव हा मजबूत इच्छाशक्तीचा, आत्ममंथन करणारा आणि मनस्वी असतो. हे लोक लहानसहान गोष्टींनी न खचणारे असतात. त्यांच्या जीवनात संघर्ष असतो, पण प्रत्येक संकटातून हे लोक अधिक बळकट होऊन बाहेर पडतात. त्यांच्या विचारांमध्ये एक वेगळी दृष्टी असते, अशी दृष्टी जी परंपरांना आव्हान देऊन नव्या मार्गांचा शोध घेते.

कधीकधी हे लोक वाढदिवस साजरे करताना संकोच करतात. मोठ्या पार्टीऐवजी, ते एखाद्या शांत जागी, स्वतःच्या विचारांमध्ये मग्न राहणं पसंत करतात. त्यांच्यासाठी वाढदिवस म्हणजे आत्मपरीक्षण, नव्याने सुरूवात करण्याचा दिवस असतो.

‘या’ क्षेत्रात मिळवतात यश

अर्थातच, 13 तारखेचा जन्म काहीसा गुंतागुंतीचा वाटतो, पण योग्य मार्गदर्शन, योग्य शिक्षण, प्रेमळ साथ आणि समजूतदार लोकांची सोबत मिळाली तर हे लोक संशोधन, राजकारण, तंत्रज्ञान, लेखन, मनोविज्ञान अशा क्षेत्रात अफाट यश गाठू शकतात. त्यांच्या आयुष्यात राहूच्या प्रभावामुळे चढउतार तर असतात, पण त्यातून हे लोक काहीतरी वेगळं आणि प्रेरणादायक निर्माण करतात.