तुम्ही दररोज वापरत असलेलं दूध भेसळयुक्त तर नाही? कसं ओळखाल ? FSSAI ने सांगितली घरच्या घरी दूध तपासायची कमाल ट्रिक

Published on -

आजकाल बाजारात शुद्ध दूध मिळणं म्हणजे जणू भाग्याची गोष्ट झाली आहे. दररोज सकाळी आपल्या घरोघरी पोहोचणारं दूध खरंच शुद्ध आहे का, याचा विचार आपण क्वचितच करतो. पण असे भेसळयुक्त दूध आपल्यासह कुटुंबाच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. अशातच सरकारची अन्न सुरक्षा संस्था FSSAI ने एक अशी सोपी, घरच्या घरी करता येणारी पद्धत सांगितली आहे, ज्यामुळे अवघ्या एका मिनिटात तुम्ही ओळखू शकता की दूध भेसळयुक्त आहे की नाही.

दुधात भेसळ होणं ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक ठिकाणी व्यापारी अधिक नफा कमावण्यासाठी दुधात पाणी किंवा इतर रसायनं मिसळतात. यातून केवळ दूधाच्या गुणवत्ता कमी होत नाही, तर अनेकदा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अशा भेसळयुक्त दुधाचा नियमित वापर केल्यास पचनाच्या तक्रारी, त्वचाविकार, आणि लहान मुलांमध्ये पोषणतत्त्वांचा अभाव अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच हे ओळखणं अत्यंत गरजेचं आहे की आपल्या घरी येणारं दूध खरंच शुद्ध आहे का?

‘अशी’ करा शुद्ध दुधाची तपासणी

FSSAI ने दिलेली ‘स्लोप टेस्ट’, जी काहीजण ‘स्लिपरी टेस्ट’ म्हणूनही ओळखतात, ही अगदी सोपी पद्धत आहे. ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त दूध आणि एक प्लेट किंवा ट्रे लागेल. पद्धत अगदी सोपी आहे, सर्वप्रथम दुधाचा एक छोटा थेंब प्लेट किंवा ट्रेमध्ये टाका. नंतर ती प्लेट किंवा ट्रे किंचित वाकवा, म्हणजे त्यावर उतार तयार होईल.

 

जर दूध हळूहळू, एकसंध पद्धतीने खाली सरकत असेल, तर ते अधिक शक्यतेने शुद्ध असतं. परंतु जर दूध झपाट्याने आणि पाण्यासारखं वाहू लागलं, तर त्यात पाणी मिसळलेलं असण्याची शक्यता अधिक असते. कारण शुद्ध दूध जरा घट्टसर असतं, त्याला एक चिकटपणा असतो, जो त्याच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे असतो. त्याउलट, भेसळयुक्त दुधात ती सगळी नैसर्गिकता हरवलेली असते, आणि त्यामुळे ते सहज वाहतं.

ही पद्धत विज्ञानावर आधारित आहे. दुधात पाणी मिसळल्याने त्याची सघनता कमी होते आणि त्यामुळे ते लवकर वाहू लागतं. ही बाब घरगुती स्तरावर सहज तपासता येणारी असून कोणत्याही महागड्या उपकरणांची आवश्यकता नाही. त्यामुळे, दररोज सकाळी दूध उकळण्याआधी फक्त एक थेंब घ्या आणि ही टेस्ट करून पाहा.

थोडक्यात, सरकारने दिलेल्या या छोट्याशा मार्गदर्शनाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या घरात येणारं दूध कितपत विश्वासार्ह आहे हे स्वतः तपासू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe