गुरुवार… आठवड्याचा असा एक दिवस जो केवळ व्यवसायिक दृष्टिकोनातून नव्हे तर अध्यात्मिक आणि पारंपरिक श्रद्धेनुसारही खूप महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः हिंदू धर्मात गुरुवार हा देवगुरू बृहस्पतींचा दिवस मानला जातो, आणि या दिवशी योग्य विधीने पूजा, उपवास आणि दान केल्यास जीवनात चमत्कार घडू शकतात. आपण जर आपल्या व्यवसायात अडथळे जाणवत असाल, आर्थिक स्थैर्य कमी भासत असेल, तर गुरुवारचे खास व्रत तुमचं भाग्य उजळवू शकतं.

प्राचीन पुराणांमध्ये, विशेषतः अग्नि पुराणात असं नमूद केलं आहे की, देवगुरू बृहस्पतींनी काशी नगरीत तपस्या करून शिवलिंगाची स्थापना केली होती. तेव्हापासून गुरुवारी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. गुरुवारी उपवास ठेवल्यास आणि काही खास उपाय केल्यास धन, बुद्धिमत्ता, संततीसौख्य आणि मानसिक शांतता प्राप्त होते, असं मानलं जातं. या उपवासाला स्कंद पुराणातही महत्व दिलं गेलं आहे.
गुरुवारच्या उपवासाचे फायदे
गुरुवारी उपवास सुरू करताना कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करावी आणि सलग 16 गुरुवार हे व्रत पाळावं. उपवास करणाऱ्याने या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाच्या फळांचा आणि फुलांचा उपयोग दानासाठी करावा. हा रंग गुरु ग्रहाशी संबंधित असल्याने शुभ फळ देणारा मानला जातो.
या दिवशी ज्ञानाची देवी सरस्वती किंवा भगवान विष्णू यांची पूजा केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगलं यश मिळतं आणि व्यावसायिकांना नवीन संधी लाभतात. गरजू व्यक्तीला अन्न आणि थोडं आर्थिक सहाय्य केल्यास पुण्यलाभ होतो, असंही मानलं जातं. यासोबतच केळीच्या पानाची पूजा करणेही शुभ मानले जाते. कारण धार्मिक मान्यतेनुसार, विष्णू भगवान केळीच्या पानात वास करतात. त्यामुळे या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करून घर किंवा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडल्यावर पूजा सुरू करावी.
“अशी” करा पुजा
पूजेच्या वेळी केळीच्या झाडाच्या मुळाशी हरभरा डाळ, गूळ आणि मनुका अर्पण करावं. हे द्रव्य गुरु ग्रहाशी संबंधित असल्याने ते अधिक प्रभावी ठरतं. यानंतर विष्णूची आरती करावी, कथा ऐकावी आणि आरतीचं पाणी प्रसाद म्हणून ग्रहण करावं. मात्र, उपवासाच्या दिवशी काही गोष्टी टाळाव्यात. उदा. पिवळ्या अन्नपदार्थाचं सेवन करू नये, कारण त्याचा प्रभाव उपवासाच्या शुद्धतेवर पडतो असं मानलं जातं.
शुभ काळ
यंदा 3 जुलै रोजी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी आहे. या दिवशी सकाळी 2 : 06 वाजेपर्यंत अष्टमी राहील आणि त्यानंतर नवमी सुरू होईल. याच दिवशी चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल, तर सूर्य देव मिथुन राशीत असतील. विशेष म्हणजे, या दिवशी अभिजीत मुहूर्त सकाळी 11:58 पासून दुपारी 12:53 पर्यंत आहे. हा काळ कोणत्याही शुभ कामासाठी अत्यंत उत्तम मानला जातो.
म्हणूनच, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश हवं असेल, घरात शांती हवी असेल, किंवा मन:शांतीची गरज वाटत असेल, तर गुरुवारी हे उपाय करून बघाच.