आपल्या दैनंदिन आयुष्यात ताण, थकवा आणि शारीरिक अशक्तपणा यांचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललं आहे. आपण कधीकधी नकळत अशा एका चक्रात अडकतो जिथे शरीरही थकलेलं असतं आणि मनही बेचैन असतं. पण अशा काळात निसर्ग आपल्याला काहीतरी खास देऊन गेला आहे, ते म्हणजे अश्वगंधा. आयुर्वेदात या औषधी वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त मानसिक शांततेसाठीच नव्हे, तर संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने अश्वगंधा हे एक प्रभावी आणि पारंपरिक औषध मानलं जातं.

अश्वगंधा, ज्याचं नाव ऐकल्यावरही एक वेगळी उर्जा जाणवते. खरंतर त्याला हे नाव त्याच्या मुळांमधून येणाऱ्या घोड्यासारख्या (अश्व) वासामुळे मिळालं. “गंधा” म्हणजे वास. त्यामुळे ‘अश्वगंधा’ म्हणजे घोड्याचा वास असलेली वनस्पती. पण ही केवळ गंधापुरती गोष्ट नाही, तर त्याच्या गुणधर्मांमध्येही तीच ताकद आहे. आयुर्वेदात अश्वगंधाचा वापर हजारो वर्षांपासून होतो आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीराला नैसर्गिक बळ देण्यासाठी.
अश्वगंधाचे फायदे
भारतीय आयुष मंत्रालयाच्या मते, अश्वगंधा हे शरीर आणि मन दोघांवर प्रभाव टाकणारं टॉनिक आहे. त्याच्या नियमित आणि योग्य सेवनाने तणाव कमी होतो, थकवा दूर होतो आणि शरीरात नवचैतन्य संचारतं. अनेक संशोधनांमधूनही हे सिद्ध झालं आहे की अश्वगंधा शरीरातील कोर्टिसोलचं (तणाव वाढवणाऱ्या हार्मोनचं) प्रमाण कमी करतं आणि त्यामुळे मानसिक स्थिरता मिळते. म्हणूनच अश्वगंधा ‘इंडियन विंटर चेरी’ या नावाने ओळखलं जातं.
अश्वगंधाचे आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता. बदलत्या हवामानात सर्दी, खोकला, ताप यांसारखे त्रास नेहमीच होतात, पण अश्वगंधा हे एक नैसर्गिक कवचासारखं काम करतं. विशेषतः चहा किंवा दूधामध्ये अश्वगंधा पावडर मिसळून घेतल्यास त्याचे फायदे अधिक वाढतात. जर तुम्हाला गोडसर चव हवी असेल, तर त्यात थोडं मध किंवा गूळ घालू शकता. सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असेल, तर आले, तुळस आणि अश्वगंधा यांचं उकळून घेतलेलं पेय फार उपयोगी पडतं.
आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक
इतकंच नाही तर, अश्वगंधा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि हाडांना बळकट करण्यासाठीही उपयुक्त आहे. अनेक आयुर्वेदाचार्य सांगतात की, नियमितपणे आणि संयमाने अश्वगंधा घेतल्यास संपूर्ण शरीराचं संतुलन सुधारतं.
पण लक्षात ठेवा, कोणतंही औषध असो, ते आपल्या शरीराला कसं अनुकूल आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं. म्हणूनच, अश्वगंधा घेताना आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलं. योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचे फायदे खूप असतात, पण अतिरेक झाल्यास काही त्रासदायक लक्षणं दिसू शकतात.