पाकिस्तानचे क्रिकेट विश्व अनेकदा राजकारण, संघर्ष आणि आर्थिक अडचणींसोबत जोडले जाते. इथे खेळाडूंना आयुष्यात यश मिळवण्यासाठी केवळ क्रिकेटचा आधार नसतो, तर अनेकवेळा वेगळ्या मार्गांनीही उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा लागतो. पीसीबीकडून वेळेवर वेतन न मिळणं, आर्थिक अराजकता आणि धोरणातील अपयश या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील काही खेळाडूंनी स्वतःची श्रीमंती अफाट मेहनतीने उभारली आहे. विशेष म्हणजे या टॉप-5 श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांसारखे आघाडीचे खेळाडू नाहीत. ही बाब क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित करणारी आहे.

अजहर अली
या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत अजहर अली. पाकिस्तानचे माजी कसोटी कर्णधार असलेले अजहर अली हे नेहमीच त्यांच्या संयमी फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यांनी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर स्वतःची संपत्ती सुमारे 125 कोटी रुपये पर्यंत वाढवली आहे.
मोहम्मद हाफीज
चौथ्या स्थानावर आहेत ‘प्रोफेसर’ या नावाने ओळखले जाणारे मोहम्मद हाफीज. त्यांच्या तर्कशुद्ध विधानांमुळे आणि प्रखर मतांमुळे ते अनेकदा चर्चेत राहतात. हाफीजने पाकिस्तानसाठी 50 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत आणि आज त्यांच्याकडे सुमारे 192 कोटी रुपये संपत्ती आहे. विविध जाहिराती आणि कमेंट्रीमधूनही त्यांना मोठे उत्पन्न मिळते.
शोएब मलिक
तिसऱ्या क्रमांकावर आहेत शोएब मलिक. पाकिस्तानी क्रिकेटमधील एक प्रमुख चेहरा, आणि वैयक्तिक आयुष्यातही नेहमीच चर्चेत असलेला खेळाडू. त्याने 287 एकदिवसीय आणि 124 टी-20 सामने खेळले असून त्याची एकूण संपत्ती जवळपास 241 कोटी रुपये इतकी आहे. ब्रँड अॅम्बेसेडरशिप, विविध देशांमध्ये लीग खेळणे यामुळे त्याच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली.
शाहिद आफ्रिदी
दुसऱ्या स्थानावर आहे क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय चेहरा शाहिद आफ्रिदी. त्याच्या फटकेबाज शैलीने लाखो चाहत्यांच्या मनात जागा मिळवली. त्याने जवळपास 400 एकदिवसीय सामने खेळले असून, त्याची एकूण संपत्ती 390 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
इम्रान खान
या यादीत अव्वल क्रमांकावर आहेत इम्रान खान. क्रिकेटमधून राजकारणात झेप घेणारे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान होणारे पहिले खेळाडू. 584 कोटी रुपयांची संपत्ती असलेले इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. 2023 मध्ये त्यांच्यावर गुन्हेगारी आरोप ठेवण्यात आले आणि तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.