भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. जिथे हजारो जाती, धर्म, परंपरा आणि श्रद्धा एकत्र नांदतात. या श्रद्धेच्या विशाल महासागरात, एक छोटीशी पण महत्त्वाची लाट अशीही आहे जी देवावर विश्वास ठेवत नाही. म्हणजेच, नास्तिक. भारतात बहुसंख्य लोक श्रद्धाळू असले तरी, काही लोक आहेत जे जग, जीवन आणि अस्तित्व याबद्दल वेगळी दृष्टी बाळगतात. ते विज्ञान, अनुभव किंवा तर्काच्या आधारे विचार करतात आणि देव वा कोणत्याही धार्मिक संकल्पनेवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांची संख्या कमी असली तरी, त्यांच्या उपस्थितीने एक महत्त्वाचा सामाजिक दृष्टिकोन निर्माण होतो आणि त्यावर आज आपण नजर टाकणार आहोत.

नास्तिक राष्ट्रांची आकडेवारी
जगभरात नास्तिकांचा विचार केला तर, चीन हा अशा लोकांचा सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे. 2020 पर्यंत संपूर्ण जगातील एकूण 89% नास्तिक हे केवळ 10 देशांतच राहतात आणि त्यापैकी तब्बल 67% म्हणजेच सर्वात मोठा हिस्सा फक्त चीनमध्येच आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर नास्तिकत्व आहे कारण तिथली कम्युनिस्ट व्यवस्था आणि शैक्षणिक धोरणे ही धर्माच्या प्रभावापासून दूर राहिलेली आहेत. ब्रिटन आणि फ्रान्स यांसारख्या युरोपियन देशांमध्येही 40% लोक स्वतःला नास्तिक म्हणवून घेतात. याशिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, झेक प्रजासत्ताक, स्वीडन आणि जपान या देशांमध्ये नास्तिक लोकसंख्या लक्षणीय आहे.
अमेरिकेचीही या यादीत नोंद आहे. चीननंतर सर्वाधिक नास्तिक अमेरिकेत राहतात, आणि 2020 पर्यंत त्यांच्या संख्येने 10.09 कोटींचा टप्पा गाठला होता. फ्रान्समध्ये 2.81 कोटी, ब्रिटनमध्ये 2.71 कोटी, दक्षिण कोरियामध्ये 2.50 कोटी, तर जपानमध्ये 7.26 कोटी लोकांनी स्वतःला नास्तिक मानले आहे. व्हिएतनाम, जर्मनी, रशिया, ब्राझीलसारख्या देशांमध्येही नास्तिकत्व झपाट्याने वाढत आहे.
भारतातील आकडेवारी
या सगळ्या आकडेवारीत भारताचा भाग मात्र फारसा मोठा नाही. 2020 पर्यंत भारतात केवळ 50,000 लोकांनी स्वतःला नास्तिक म्हटले आहे. ही संख्या 2010 मध्ये 30,000 होती, म्हणजेच गेल्या 10 वर्षांत अवघ्या 20,000 लोकांनी देवावरचा विश्वास सोडून नास्तिक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
भारतात नास्तिक असणं ही अनेक वेळा सोपी गोष्ट नसते. सामाजिक दबाव, कुटुंबीयांची श्रद्धा, धार्मिक सण-समारंभांतील भागीदारी या साऱ्यामुळे नास्तिक व्यक्तींना आपले विचार मोकळेपणाने मांडणे अवघड जाते. तरीही, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, इंटरनेटचा प्रसार आणि आंतरराष्ट्रीय संवादामुळे ही संख्या हळूहळू वाढते आहे. हे लोक केवळ देव नाकारत नाहीत, तर ते जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतात. प्रश्न विचारतात, तर्क लावतात आणि वैयक्तिक अनुभवांच्या आधारावर मत बनवतात.