कसोटी क्रिकेटमध्ये सातत्य टिकवून धावा करणे म्हणजे खरे कसब. वर्षभर विविध देशांत, वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर सामना करताना फलंदाजाची परीक्षा होते. अशा या कठीण फॉरमॅटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणं ही केवळ फलंदाजी नव्हे, तर संयम, कौशल्य आणि शारीरिक क्षमतेची कसोटी असते. या कसोटीमध्ये अनेक महान फलंदाजांनी नाव कोरले, पण जेव्हा एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांची यादी पाहतो, तेव्हा ती थोडीशी धक्कादायक वाटते. कारण पहिल्या क्रमांकावर ना कोहली आहे, ना सचिन, ना सध्याचा यशस्वी इंग्लिश फलंदाज जो रूट. या यादीत पाकिस्तानचा एक विस्मरणात गेलेला दिग्गज सर्वांना मागे टाकतो!
मायकेल क्लार्क
या यादीची सुरुवात होते ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कपासून, ज्याने 2012 मध्ये अवघ्या 11 कसोटीत 1,595 धावा केल्या होत्या. त्याच्या बॅटमधून 5 शतके आणि 3 अर्धशतके निघाली होती. क्लार्कचा तो फॉर्म इतका जबरदस्त होता की प्रत्येक मालिकेत तो शतक झळकावतोय असे वाटत होते.
ग्रॅमी स्मिथ
यानंतर आहे दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ, ज्याने 2008 मध्ये 15 कसोटीत 1,656 धावा करत सलामीवीर म्हणून आपले स्थान अजिंक्य केले. स्मिथने त्या वर्षी 6 शतके आणि 6 अर्धशतके ठोकत दक्षिण आफ्रिकेला अनेक विजय मिळवून दिले होते.
जो रूट
तीसऱ्या स्थानावर आहे इंग्लंडचा जो रूट, ज्याने 2021 मध्ये 15 कसोटीत तब्बल 1,708 धावा केल्या. 6 शतके आणि 4 अर्धशतकांसह त्याने फलंदाजीचा धडाका दाखवला. त्याच्या त्या कामगिरीने त्याला सध्याच्या युगातील सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाजांपैकी एक मानले गेले.
व्हिव्ह रिचर्ड्स
पण जेव्हा आपण दुसऱ्या स्थानावर पाहतो, तिथे आहे एक अफाट नाव व्हिव्ह रिचर्ड्स. वेस्ट इंडिजचा हा दिग्गज फलंदाज 1976 मध्ये 11 सामन्यांमध्ये 1,710 धावा करत जगाला आपली ताकद दाखवून गेला होता. त्या वर्षी त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतके मारली होती. त्या काळातील बॉलिंग अटॅक आणि खेळपट्ट्या पाहता ही कामगिरी अधिकच विशेष ठरते.
मोहम्मद युसूफ
पण सर्वांच्या वरती आहे एक पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद युसूफ. 2006 मध्ये युसूफने कसोटी क्रिकेटमध्ये जणू काही झंझावात आणला. 11 कसोटीत 1,788 धावा, त्यात 9 शतके आणि 3 अर्धशतके. ही कामगिरी अजूनही अबाधित आहे. मागील 19 वर्षांत कोणीही त्याच्या जवळपास पोहोचू शकलेलं नाही. विशेष म्हणजे या यादीत एकही भारतीय फलंदाज नाही.