भारतीय महिला क्रिकेटसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक टप्पा पार करत भारताच्या नावावर आणखी एक मानाचा ठसा उमटवला आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात तिने आपल्या फिरकीने धावसंख्येवर नियंत्रण ठेवत तीन महत्त्वाचे बळी टिपले आणि त्याचबरोबर महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 6 खेळाडूंच्या यादीत स्थान पटकावले.
दीप्ती शर्मा

झुलन गोस्वामीच्या ऐतिहासिक परंपरेला पुढे नेत दीप्तीने आपल्या नावावर 302 बळींची नोंद केली आहे. यामध्ये 5 कसोटींमध्ये 20, 106 एकदिवसीय सामन्यांत 135 आणि 128 टी-20 सामन्यांत 147 बळींचा समावेश आहे. ही आकडेवारी तिच्या खेळातल्या परिपक्वतेची आणि मेहनतीची साक्ष देते. दीप्ती ही 300 हून अधिक बळी घेणारी भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे, आणि हे यश तिला आजच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूंमध्ये स्थान देतं.
झुलन गोस्वामी
या यादीत भारताची माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी अव्वल स्थानी आहे. तिच्या नावावर 355 बळींची जबरदस्त नोंद आहे. झुलनने आपल्या दीर्घ कारकिर्दीत 12 कसोटींमध्ये 44, 204 एकदिवसीय सामन्यांत 255 आणि 68 टी-20 सामन्यांत 56 बळी घेतले होते. त्यांचे योगदान भारतीय महिला क्रिकेटमध्ये अमूल्य आहे.
कॅथरीन सायव्हर-ब्रंट, एलिस पेरी
इंग्लंडच्या कॅथरीन सायव्हर-ब्रंटने 335 बळींसह दुसरे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी, जिला अनेकजण क्रिकेटमधील “सुपरवुमन” मानतात, तिने 331 बळी घेतले आहेत. तिची शिस्तबद्ध कामगिरी, चपळता आणि अष्टपैलुत्व क्रिकेटरसिकांना भुरळ घालते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माइल हिच्या नावावर 317 बळींची नोंद आहे.
अनिसा मोहम्मद
वेस्ट इंडिजची फिरकीपटू अनिसा मोहम्मद हिनेही आपल्या कारकिर्दीत 305 बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, तिने एकही कसोटी सामना न खेळता हा टप्पा गाठला आहे, हे तिच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कौशल्याचे उदाहरण आहे.
यातच आता दीप्ती शर्माचेही नाव जोडले गेले आहे. तिची कामगिरी केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नाही, तर ती एक प्रेरणा आहे. ग्रामीण हरियाणातून आलेली ही मुलगी, जिचं पहिलं प्रेम क्रिकेट होतं, आज जागतिक स्तरावर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहे. इंग्लंडच्या मैदानावर दीप्तीने हे यश मिळवलंय, त्यामुळे त्याचं महत्व आणखीनच वाढलंय.